Breaking News

बनावट नोटांचा सुळसुळाट, सर्वसामान्यांची डोकेदुखी

पाथर्डी (प्रतिनिधी) । 03 - बनावट नोटांचा शहरात सुळसुळाट झाला आहे. कोणाकडुन तरी आलेली बनावट नोट सर्वसामान्य माणसाची डोकेदुखी ठरत आहे. बँकेच्या अधिकार्यांकडून अपमानीत होवुन कारवाईच्या भीतीने प्रत्येकजण गप्प बसतो आहे. बनावट नोटाची चौकशी होवुन संबंधितावर कारवाई झाली पाहीजे अशी मागणी जनतेतून होत आहे. 
शहरात गेल्या सहा महिन्यांपासून बनावट नोटा आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. बँकेमधे पैसे भरण्यासाठी
केलेल्या अनेकांना तुमची ही नोट बनावट आहे. लगेच लाल रंगाच्या पेनने नोटेवर चुकीची फुली मारुन संबंधिताचे नाव व पत्ता घेवून बनावट नोट जमा करण्याचे काम बँकेचे अधिकारी करतात. याला कोणाचा विरोधही नाही. मात्र अज्ञानी ,अशिक्षीत माणसाला बनावट नोट ओळखता येत नाही. किंबहुना शिकलेल्या माणसालाही सहजासहजी नोट बनावट असल्याचे समजत नाही. कोणीतरी पैसे देताना नोट बनावट येते. बँकेत भरणा करताना कॅशीअरच्या ध्यानात नोट बनावट असल्याचे निदर्शनास येते. मग नोट जमा करुन घेतली जाते. परंतु यामुळे हजार व पाचशे रुपयाचा भुर्दंड संबधित माणसाला बसतो. बँकेच्या अधिकार्याला काही म्हटले तर मग पोलिसात जावे लागेल असे सांगितले जाते. पोलिसांच्या भीतीने मग भिक नको कुत्रा आवर म्हणन्याची वेळ येते. अनेक व्यक्तींची अशी फसवणूक रोजच होते. बनावट नोटामुळे हजारो रुपयाचा नाहक भुर्दंड शेतकरी वर्गाला बसतो. पोलिसांनी बनावट नोटा चलनात आणणार्या टोळीचा तपास करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
कोणत्यातरी व्यवहराच्या निमित्ताने एखादी नोट बनावट येते. बँकेचे अधिकारी नोट जमा करुन घेतात हा सर्वसामान्य माणसावरील अन्याय आहे. पोलिसांनी बनावट नोटा चलनात आणणारी टोळी उजेडात आणावी व सर्वसामान्य माणसाची फसवणूक थांबवावी.