राष्ट्रीय महामार्गाचा ‘मार्ग’ अखेर झाला मोकळा
। काँग्रेसच्या वतीने निवेदन । पालकमंत्री प्रा.शिंदे यांच्या बैठकीत निघाला तोडगा ।
अहमदनगर (प्रतिनिधी) । 03 - भिंगार वेशीत अडकलेला कल्याण विशाखापट्टण राष्ट्रीय महामार्गाचा मार्ग अखेर मोकळा झआला आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे, जिल्हाधिकारी अनिल कवडे, आमदार संग्राम जगताप, कँटोन्मेंट बोर्डाचे अधिकारी, राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता आणि भिगांर शहरातील प्रतिनिधींच्या उपस्थित शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यात हा तोडगा निघाला.शहरातून जात असलेल्या महामार्गाला कोणतचा अडथळा नाही. कँटोन्मेंट बोर्ड सार्वजनिक बांधकाम विभागाला जागा देण्यास तयार आहे. त्याचबरोबर भिंगार वेशीत असलेल्या व्यापार्यांची दुकाने म्हणजे अतिक्रमणे नसून, ती कँटोन्मेंटच्या जागेत आहेत. त्यामुळे ही जागा कँटोन्मेंटला सार्वजनिक बांधकाम विभागाला म्हणजेच पर्यायाने महामार्गासाठी देण्यास तयार असल्याचे कँटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनित लोटे यांनी बैठकीत सांगितले. एमआयडीसीच्या पाइपलाइनमधून होणार्या पाणी गळतीवर, बसस्थानक, पोलीस ठाण्याचे स्थलांतर, कँटोन्मेंट बोर्डाला नगरपालिकेचे फायदे मिळावेत, कापुरवाडीतील तलावातील गाळ काढणे, भिंगार शहराला घरगुती दराने पाणी मिळावे आणि भुईकोट किल्ल्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे अशा विषयावर चर्चा झाली.
आमदार संग्राम जगताप, काँग्रेसचे भिंगार शहराध्यक्ष अँड़ आर. आर. पिल्ले, कार्याध्यक्ष शाम वाघस्कर, राष्ट्र सेवा दलाचे रिजवान शेख, शिवसेनेचे भिंगार शहरप्रमुख सुनील लालबोंद्रे, कँटोन्मेंट बोर्डाचे सदस्य प्रकाश फुलारी व रवींद्र लालबोंद्रे, गणेश साठे, कँटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत लोटे, महामार्ग विभागाचे अभियंता एस. एस. कुलकर्णी, कँटोन्मेंट बोर्डाचे अभियंता महेंद्र सोनवणे, एमईएसचे अभियंता दुर्गाश्याम, एमआयडीसीचे अभियंता विनायक खांदवे, विभाग नियंत्रक अशोक जाधव आदी उपस्थित होते.
दरम्यान, शहराच्या महत्त्वपूर्ण विषयांवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होत असताना कँटोन्मेंट बोर्डाच्या चार सदस्यांनी पाठ फिरवली. त्यात दोन महिला लोकप्रतिनिधींचा समावेश होता. गैरहजर राहणार्या सदस्यांमध्ये तीन राष्ट्रवादीचे व एक भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे नगर शहराचे आमदार संग्राम जगताप या बैठकीला उपस्थित राहून भिंगार शहराच्या प्रश्नांबाबत बाजू मांडत होते. त्याचा पाठपुरावा करत होते. पण त्यांच्या पाठपुराव्याला बळ देण्यासाठी राष्ट्रवादीच्या सदस्यांची अनुपस्थिती चांगलीच खटकत होती.
