Breaking News

ज्येष्ठ साहित्यिक रा. चिं. ढेरे यांचे निधन

प्राच्यविद्या संशोधनामध्ये महत्त्वपुर्ण योगदान

पुणे, दि. 01 -  ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक-संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ढेरे यांची प्रकृती ठीक नव्हती. आज राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. भारतीय इतिहास, लोकसाहित्यासोबत प्राच्यविद्या संशोधनात त्यांनी अतुलनीय योगदान दिले. या विषयांवर विपुल लेखन करीत त्यांनी साहित्यात मोलाची भर घातली.लज्जागौरी, तुळजाभवानी ही त्यांची महत्त्वाची साहित्यसंपदा. इतिहासाचे लेखन करणे म्हणजे केवळ कागदपत्रांचे पुरावे सादर करणे नव्हे. कागदपत्रांमधील माहितीचे अस्सलपण तपासताना समकालीन कागदपत्रांमध्ये सापडणारे अन्य संदर्भ त्या माहितीशी ताडून पाहणे आवश्यक असते, अशी भूमिका ते नेहमी मांडत असत.
सध्याचे प्रश्‍न व्यावहारिकदृष्टया गंभीर झाले असून, जीवन आर्थिक पातळीवर अशक्य झाले आहे. व्यवहारावर दृष्टी ठेवली की शुद्ध ज्ञानोपासना ढिलावते. ज्ञान आणि सत्याच्या शोधासाठी काम करणे ही वेगळी प्रेरणा आहे. त्यामध्ये व्यवहार सुटणे गैरसोयीचे वाटते. व्यवहाराच्या आणि शुद्ध ज्ञानोपासनेच्या प्रेरणा वेगळया आहेत, म्हणूनच त्यातील संघर्षही अटळ आहे, ढेरे यांचे हे विचार त्यांच्या आयुष्याचे सार सांगणारे आहे. डॉ. अरुणा ढेरे आणि वर्षा गजेंद्रगडकर या त्यांच्या कन्या आहेत.