Breaking News

कुरूंदा येथील आपादग्रस्तांच्या मदतीसाठी जमीयतची मदत फेरी

जतूर / प्रतिनिधी, दि. 08 -  कुरंदा येथील आपादग्रस्तांना मदत करण्यासाठी जिंतूर शहरातून मंगळवार 5 जुलै रोजी जमीयत उलमा  मराठवाड़ा व व्यापारी महासंघाच्यावतीने मदत फेरी काढण्यात आली. या मदत फेरीमध्ये शहरातील व्यापारी व नागरिकांनी सढळ हाताने मदत करून 25 हजार रुपयांची मदत केली.
वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे ढगफुटी होवून 300 घरांमध्ये तब्बल 4 ते 5 फुटापर्यंत पाणी शिरले होते. अनेक कच्ची घरे जमीनदोस्त झाली. नागरिकांच्या घरातील अन्नधान्य संसारोपयोगी साहित्य,  पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच जमीयत उलमाचे मराठवाडा अध्यक्ष मुफती मिर्झा कलीम बेग , जिल्हाध्यक्ष खारी अब्दुल रशीद, तालुकाध्यक्ष मौ सिराज नदवी, शाहेद बेग मिर्झा, सयद मोहसीन आदी सहका-यांनी त्या ठिकाणी जावून पाहणी केली. यावेळी जमीयतच्या हिंगोली शाखेतर्फे 55 कुटुंबाना प्रत्येकी 1 हजार रुपये या प्रमाणे रोख मदत करण्यात आली. यावेळी जमीयचे मराठवाडा अध्यक्ष मुफती कलीम बेग यांनी जिंतूरतर्फे भरीव आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी जिंतूर शहरातील सर्व मस्जिदमध्ये आवाहन करून रोख रक्कम, नविन कपडे, इदसाठी सामान, अन्नधान्य, देण्याचे नागरिकांना आवाहन केले. मंगळवारी त्यांनी शहरातील प्रमुख रस्त्यावरून मदत फेरी काढली. यात तहसीलदार राम बोरगावकर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश दरगड, कार्याध्यक्ष सुनिल तोष्णीवाल, उपाध्यक्ष गणेश कुरे, प्रदीप कोकडवार, शेख ताज, अ‍ॅड. मनोज सारडा, यांच्यासह अनेक नागरिक, व्यापारी सहभागी झाले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिंतूरकरांनी आपादग्रस्तांच्या मदतीसाठी 25 हजाराची मदत केली. तसेच अनेक महिला, नागरिकांनी अन्नधान्य, कपडे अशी मदत कुरुंदा वासीयांना मंगळवारी रात्रीच वाटप करण्यात आली. यानंतरही जिंतूर शहराच्यावतीने मदतीचा दुसरा टप्पा अन्नधान्य व कपडयाच्या स्वरूपात घेवून जाणार असल्याचे मुफ़्ती कलीम बेग यांनी सांगितले.