Breaking News

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याचे उत्तम नियोजन : डॉ. अजित कुलकर्णी

सातारा, सांगली / दि. 7 (प्रतिनिधी) - श्री संतश्रेष्ठ शिरोमणी ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत अतिशय आनंदाने आणि परिश्रमपूर्वक करुन सर्व वारकरी बंधूंना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जिल्हा प्रशासनाने उत्तम नियोजन केले मी सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो, अशा शब्दात श्री ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान समिती, आळंदीचे प्रधान विश्‍वस्त व सोहळा प्रमुख डॉ. अजित कुलकर्णी यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली.  
डॉ. कुलकर्णी म्हणाले की, श्री संत श्रेष्ठ शिरोमणी ज्ञानेश्‍वर महाराज यांचा आळंदी,पंढरपूर पायी पालखी सोहळा लोणंद या गावी विसावला आहे. लोणंद गावातील ग्रामस्थ, पदाधिकारी, प्रशासकीय (खंडाळा) अधिकार्‍यांनी अतिशय आनंदाने परिश्रम करुन स्वागत केले. या ठिकाणी पालखी तळावर वारकरी बंधूंना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. अन्नधान्य, गॅस, जळणासाठी रॉकेल, आरोग्य सुविधा, पाणी पुरवठा, विद्युत आयोजन इ. आवश्यक सुविधा देवून वारकरी बंधूंचे आशीर्वाद घेतले आहेत. जिल्हा प्रशासनानेही उत्तम नियोजन केले आहे. मी सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो.
भारतीय समाजातील सहकार्य,सहचर्य, सोहार्दता या त्रिसुत्रीचे दर्शन लोणंद गावात दिसून आले. आज ईदचा सण असूनही येथील मुस्लिम बांधवांनी ती उद्या साजरी करण्याचे ठरविले. कारण माऊलींचे स्वागत करणे हेच आमचेही कर्तव्य समजले आहे. यासाठी त्यांचे मनापासून अभिनंदन व्यक्त करतो, अशी प्रतिक्रीया डॉ. कुलकर्णी आणि विश्‍वस्त योगेश देसाई यांनी नोंदविली आहे.