Breaking News

मेढा-मार्ली घाटात दरडी कोसळल्याने वाहतूक ठप्प

सातारा, सांगली / दि. 7 (प्रतिनिधी) - गेले 4 दिवसांपासून पडत असलेल्या धुवाँधार पावसामुळे जावली तालुक्यातील महाबळेश्‍वर तसेच जावली तालुक्यातील घाटांमध्ये दरडी कोसळण्यास सुरुवात झाली आहे. काल मेढा-मार्ली घाटात दोन ठिकाणी मोठ्या दरडी कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्ण: ठप्प झाली. दरम्यान, या दरडी कोसळल्याने परिसरातील 20 गावांचा संपर्क तुटला आहे. याबाबतची माहिती मिळताच घाट सुरक्षा यंत्रणेने घटनास्थळी भेट देऊन दरडी हटवण्याचे युध्द पातळीवर सुरू आहे.
मेढ्यावरून दिवदिव फाटामार्गे हा घाट मार्ली-सायघर असा भिलार या गावाला जातो. 15 किलोमीटरचा हा घाट वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक आहे. या घाटामध्ये मधोमध 10 फूट रुंदीचा रस्त्याला खड्डा पडल्याने गेल्या दोन वर्षांपासून घाट 100 फूट खचला आहे. बांधकाम विभागाने गेल्या 2 वर्षांपासून या घाटातील रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे. काल सकाळी या घाटात दोन ठिकाणी मोठ्या दरडी कोसळल्या.  त्या रस्त्याच्या मधोमध पडल्याने घाट वाहतूकीसाठी बंद झाला आहे. जावलीचे तहसीलदार रणजित देसाई व बांधकाम विभागाचे मधुकर सूळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बांधकाम विभागाची घाट सुरक्षा यंत्रणा दरड कोसळल्याची माहिती मिळताच मार्ली-मेढा घाटात पोहचली असल्याचे सांगितले. दोन्ही ठिकाणच्या दरडी हटवण्याचे काम सुरु असल्याची माहिती देसाई यांनी दिली.