प्रभाग 30 मधील बंद पाईप गटार योजना मॉडेल ठरेल
। गणेश भोसले यांचे प्रतिपादन
अहमदनगर, दि. 04 - गेल्या 7 वर्षांत प्रभागामध्ये जी विकासकामे केली, त्यामध्ये मी समाधानी आहे. अनेक दिवसांचा प्रश्न आज मार्गी लागला आहे. बंद पाईप गटार योजनेमुळे या परिसरातील आरोग्याचा प्रश्न मार्गी लागेल. ही बंद पाईप गटार योजना मॉडेल गटार योजना ठरेल. या गटारीवर 1 किलोमीटरचा फूटपाथ करण्यात येणार आहे. आजूबाजूला वृक्षारोपण करून आकर्षक असे विद्युतीकरण करण्यात येईल. नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला, त्या विश्वासाला आपण पात्र राहिलो. प्रभागामध्ये अनेक विकासाची कामे करायची आहेत, असे प्रतिपादन स्थायी समितीचे सभापती गणेश भोसले यांनी केले.प्रभाग 30 मध्ये स्थायी समितीचे सभापती गणेश भोसले यांच्या प्रयत्नातून बंद पाईप गटारीच्या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक एस. एम. धोंगडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्री. भोसले बोलत होते. याप्रसंगी दादासाहेब शिंदे, जितेंद्र निकम, पांडुरंग जपे, महावीर भंडारी, भाऊसाहेब फुलसौंदर, प्रा. ज्ञानेश्वर अहिरराव, सुधाकर परभाणे, प्रमोद गांधी, विजय गुगळे, प्रकाश गटणे, संजय भडगे, मनोरंजन गटकळ, बाळासाहेब ढगे, संजय वाघ, चंपालाल बोकरिया, भरत शहा, आनंद देसर्डा, अंबादास बाबर, मच्छिंद्र नन्नवरे, श्याम हिवाळे, रसिक बोरा, जे. डी. गावडे, उल्हास पवार आदी उपस्थित होते.
भोसले पुढे म्हणाले की, 65 लाख रुपये खर्चून हे गटारीचे काम होणार असून, हे काम 15 दिवसांत पूर्ण होणार आहे. प्रभागामध्ये अनेक रस्ते आपण करणार आहोत. विकासकामे करताना खूप अडचणींना सामोरे जावे लागते. जिद्द व चिकाटी ठेवल्यास कामांचा पाठपुरावा ठेवल्यास कामे मंजूर होतात. पुढील काळातही प्रभागामध्ये विविध विकासाचे प्रकल्प राबवून आदर्श असा प्रभाग निर्माण करीन. प्रभागातील विकासकामे पाहण्यासाठी इतर भागातील लोक येतील, असे ते म्हणाले.
शिंदे म्हणाले की, श्री. भोसले यांनी प्रभागामध्ये विकासाबरोबर सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. शासनाने आज वृक्षारोपण हा कार्यक्रम राबविला. परंतु भोसले यांनी गेल्या 7 वर्षांपासून प्रभागामध्ये वृक्षारोपण लावून जगवण्याचे काम केले. नगर शहराचे 1 नंबरचे उपनगर होण्याचा मान त्यांच्यामुळे मिळाला आहे. त्यांनी कामामध्ये कधीही तडजोड केली नाही. ठेकेदारांकडून चांगल्या दर्जाची कामे करून घेतल्यामुळे आज प्रभागामधील सर्व भागात रस्ते होऊ शकले, असे ते म्हणाले.
