दहशतवाद्यांकडून 20 जणांची हत्या
ढाक्यातील ओलिसनाट्यात 6 दहशतवादी ठार !
ढाका, दि. 02 - बांगलादेशची राजधानी ढाका येथील परदेशी दूतावास, वकिलांतीची कार्यालये असलेला, सुरक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या डिप्लोमॅटिक क्वार्टरच्या उपहारगृहातील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 20 जण ठार झाले आहेत. मात्र लष्कराच्या जवानांनी दहशतवादयांना प्रत्युत्तर देत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. एवढेच नव्हे तर एक दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश मिळाले असून काही परदेशी नागरिकांसह 13 ओलीसांची रेस्टॉरंटमधून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. रेस्टॉरंटमधील गोळीबार आता थांबला असून 1 दहशतवादी फरार झाल्याची माहिती मिळत आहे. तब्बल13 तासांपासून सुरु असलेले ओलिसनाट्य संपुष्टात आले आहे.दहशतवाद्यांनी परदेशी नागरिकांसह एका भारतीय नागरिकासह जपान, अर्जेंटिना, इटली, श्रीलंका या देशांतील नागरिकांचाही समावेश होता. दहशतवाद्यांनी ओलिस ठेवलेल्यांपैकी 20 जणांची शस्त्रांनी वार करत निर्घृण हत्या केली आहे. इस्लामिक स्टेटच्या (इसिस) दहशतवाद्यांकडून हा हल्ला घडविण्यात आल्याचे समोर आले आहे.परदेशी पर्यटकांचा राबता असणारा ढाक्यातील ’गुलशन’ परिसर महत्वपूर्ण मानला जातो. शुक्रवारी रात्री 9 च्या सुमारास 8 ते 10 दहशतवाद्यांनी आर्टिझन बेकरीत घुसून बेछूट गोळीबार करण्यास सुरूवात केली आणि एकच हल्लाकल्लोळ माजला. या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिस व लष्कराने घटनास्थळी धाव घेत आसपासच्या नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. मात्र रेस्टॉरंटमधील सुमारे 60 नागरिकांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवत पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. त्यातील काही जणांना ठारही केले. त्यानंतर पोलिसांनी या रेस्टॉरंटला पूर्णपणे घेरत दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान ढाका येथील भारतातील सर्व अधिकारी सुरक्षित असल्याचे परराष्ट्र मंत्रालयातर्फे स्प्ष्ट करण्यात आले आहे. या परिसरातच अनेक देशांचे दुतावास आहेत. या परिसरात भारतीय दूतावासही आहे. भारतीय दुतावासातील सर्व कर्मचारी सुखरुप असून, भारतीय परराष्ट्र मंत्रालय परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.
