Breaking News

एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती प्रतिकूल होण्यास शासकीय धोरण जबाबदार


अहमदनगर, दि. 05 - राज्यात एसटी सुरू होऊन 68 वर्षे पूर्ण झाली आहेत. खेड्यांना शहराला जोडण्याची भूमिका एसटीने पार पाडली. दळणवळणासाठी एसटी महत्त्वाची ठरली. गावांचा विकास होण्यामध्ये एसटीचा मोठा वाटा आहे. एसटीत काम करणार्‍या कामगारांमुळे हे शक्य झाले. त्यांनी अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला. कामगारांना येणार्‍या अडचणी व त्यांचे प्रश्‍न सुटावेत, या उद्देशाने विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती प्रतिकूल होण्यास शासकीय धोरण जबाबदार आहे, असे प्रतिपादन जनरल सेक्रेटरी हनुमंतराव साठे यांनी केले.
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने एसटीचा 68वा वर्धापनदिन व विभागीय मेळाव्याचे उद्घाटन श्री. ताठे यांच्या हस्ते केक कापून व दीपप्रज्ज्वलन करून संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय कार्याध्यक्ष संदीप शिंदे, प्रदेश सचिव विजय पवार, महिला राज्य संघटक शिल्पाताई नाईकवाडे, विभागीय अध्यक्ष शिवाजी कडुस, सचिव डी. जी. अकोलकर, विभागीय अध्यक्ष रजनी साळवे, रोहिदास आडसूळ आदी उपस्थित होते.
साठे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र एशटी कामगार संघटनेने शासनाला कामगार हिताचे निर्णय घेण्यास भाग पाडले. एसटी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावा. जेणेकरून नवीन कामगारांना भरीव आर्थिक लाभ होईल. राज्य शासकीय कर्मचारी म्हणून एसटी कामगारांना घोषित करावे. नवीन कामगार करार होईपर्यंत 25% अंतरिम वाढ लागू करावी, कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द करावी. शासकीय कर्मचारी व एसटी कामगाराचे वेतन यामधील तफावत दूर व्हावी. मागील कामगार करारातील काही कर्मचार्‍यांच्या वेतनातील तफावत दूर व्हाव्यात, अशा आमच्या मागण्या आहेत, असे ते म्हणाले. शिवाजी कडुस म्हणाले की, एसटी कामगार संघटनेने बँकेच्या माध्यमातून अनेक कामगारांना उभे करण्याचे काम केले आहे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी कर्जरूपी मदत केली आहे. शासकीय लाभ मिळवून देण्यात एसटी कामगार संघटना यशस्वी झाली आहे. सर्वसाामान्य नागरिकांना नजरेसमोर ठेवून एसटी त्यांना अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे. एसटी कामगार मोलाची भूमिका बजावत आहे, असे ते म्हणाले.