Breaking News

राज्यातील युतीचे सरकार शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेणारे

। गृहराज्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना.प्रा.राम शिंदे यांची ग्वाही

अहमदनगर, दि. 29 - ग्रामीण  भागातील शेतकर्‍यांनी  शेडनेटसारखे प्रकल्ब राबविणे ही खर्‍या अर्थाने काळाची गरज बनली आहे. ही काळाची गरज आहे. बदलत्या काळानुसार व परिस्थितीनुसार बदलले पाहिजे. आधुनिक पद्धतीने शेती करीत असताना, राज्य सरकार शेतकर्‍यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे. राज्यातील युतीचे सरकार हे शेतकर्‍यांच्या हिताचे जास्तीत जास्त निर्णय घेणारे सरकार आहे. शेतकर्‍यांना शेती व्यवसायासाठी हवी ती मदत शासनाकडून मिळवून देऊ, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रा. राम शिंदे यांनी दिली. 
मिरजगाव येथील कृषिरत्न फार्मर्स ग्रुपच्या 10 शेडनेटचे उद्घाटन व फळतोडणीचा शुभारंभ कार्यक्रम ना. शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ना. शिंदे बोलत होते. या कार्यक्रमास प्र. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बर्‍हाटे, प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, पणनचे संचालक नानासाहेब निकत, पं. स. सदस्य धनराज कोपनर, अशोक गोरखे, तालुका कृषी आधिकारी राजेंद्र सुपेकर, संपत बावडकर, गुलाब तनपुरे, प्रकाश भंडारी, विजय पवार, कृषिरत्न फार्मर्स ग्रुपचे संजय पवार, रमेश म्हेत्रे, विजय माने, सागर पवार, राजेंद्र कोल्हे, उद्धव म्हस्के, बाळासाहेब चिखले, गणेश पवार, संदीप चिखले, बाबा गाडेकर, महा. बँकेचे फराटे, गणेश तोरडमल, संतोष कोरडे, संदीप पुराणे आदींसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ना. शिंदे पुढे म्हणाले की, कर्जत- जामखेड या जिरायती भागात शेडनेट पॉली हाऊस प्रकल्प पहिल्यांदाच राबविला जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची ची आर्थिक परिस्थिती सुधारेल, शासनाची सबसिडी असलेल्या या शेडनेट प्रकल्पाद्वारे जास्तीत जास्त उत्पादन काढून आधुनिक शेती व्यवसायाकडे या भागातील इतरही शेतकर्‍यांनी झुकले पाहिजे. इस्त्रायलच्या धर्तीवर शेडनेटचे तंत्रज्ञान भारतात आणले आहे. त्याचा शेतकर्‍यांनी फायदा घ्यावा. या भागात शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध होऊन विकासकामे झाली असून, जलयुक्त शिवार योजनेची व रस्त्याची कामे करण्यात आली आहेत. राज्य शासनाने राबविलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतील मंजूर झालेली प्रकरणे मागीॅ लागल्याने त्यासाठी लवकरच निधी उपलब्ध होईल. कर्जत-जामखेड भागातील रस्त्यांची उर्वरित कामे करून लवकरच पूर्ण करू. त्यामुळे गावे डांबरीकरणाच्या माध्यमातून जोडली जातील. विकासाच्या कामासाठी राज्याकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊ, असे त्यांनी सांगितले.
यावेळी ना. शिंदे मांनी उपस्थित अधिकार्‍यांना जलयुक्त शिवार योजनेतील कामे चांगल्या पद्धतीने करण्याचे आदेश दिले, तसेच जे अधिकारी कामे करत नाहीत, त्यांची सोय करायचे ठरवले असल्याने कामात चुकारपणा करणार्‍यांची गय केली जाणार नाही, अशी तंबी दिली. ना. शिंदे यांनी येथील शेडनेटची पाहणी करून शेडनेटधारक शेतकर्‍यांनी यामध्ये घेतलेल्या पिकांची माहिती घेऊन त्यातून या शेतकर्‍यांनी काढलेल्या उत्पादनाचे कौतुक केले.