Breaking News

रिक्षा चालक-मालक संघाची मागणी

।  नगरमधील बाराशे रिक्षांना त्वरित परमिट द्या

अहमदनगर (प्रतिनिधी)। 29 - शहरातील हजारो परवाना धारक व बॅच धारक रिक्षा चालविण्याचा परवाना नसल्याने बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे शहरासाठी राहिलेल्या 1200 परवाने त्वरीत करावे अशी मागणी शहर रिक्षा चालक मालक संघाच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) राजाराम गिते यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 
शहरातील अ‍ॅटोरिक्षा लायसन्स व बॅचधारक हे आजमितीला हजारोपेक्षा जास्त प्रमाणात असून परमिट नसल्यामुळे बेरोजगार झालेले आहे. सुपीम कोर्टाच्या आदेशानुसार रोजगारासाठीचे स्वातंत्र्यामध्ये रिक्षा चालवण्यासाठीच्या हक्कापासून कोणीही बंधन करू शकत नाही. असे असताना नगर शहरातील सुमारे 1 हजार 942 परिमट आपल्या कार्यालयामार्फत कोणतीही पत्र न पाठविता रद्द करण्यात आले होते. त्यामुळे जवळपास 1 हजार 200 लोकांचा रोजगार हिसकावूनच घेण्याचा हा प्रकार असून त्वरित ही परमीट देण्यात यावीत, या मागणीचे निवेदन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गीते यांना शहर रिक्षा चालक-मालक संघाच्यावतीने करण्यात आली.
यावेळी संघाचे अध्यक्ष अफजल सय्यद, तुकाराम बोरूडे, अशोक शिंदे, गोरख शिंदे, संपत शिंदे, रामदास शिंदे, संजय शेंडगे, बाळासाहेब वाघ, साहेबराव शिंदे, बापू धनगर, राहुल साळी, तात्या धनगर, संजीव चांदणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, 17 वर्षांच्या कालावधीनंतर नगर शहरासाठी 27 जानेवारी 2014 रोजीच्या शासकीय आदेशानुसार 1 हजार 800 परमिट मंजूर करण्यात आले होते. त्यासाठी 1 हजार लोकांनी परमिटसाठी मागणी केली होती. मात्र 600 परमिटचे वाटप शहरासाठी करण्यात आले होते. 400 लाइसन्स बॅजधारक असताना ते सर्व परमिटपासून वंचीत राहिले. 2014 नंतर नगर शहर वगळता इतरत्र परमिट पुन्हा सोडण्यात आले होते. नगर शहरातील परवाने व बॅच धारकांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी हे 1 हजार 200 परमिट तात्काळ सुरू करण्यात यावे. त्यासाठी मुदत कालावधी नसावी, परमिट कोटा संपेपर्यंतचा अवधी असावा. परमिटचा काळाबाजार तेजीत असून तो थांबण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.