Breaking News

बुडीत कर्जावर तोडगा काढणार जेटली !

नवी दिल्ली, दि. 05 -  बुडीत कर्जाच्या समस्येने ग्रासलेल्या बँका आणि वित्तसंस्थांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि वित्तसंस्थांच्या प्रमुखांशी सोमवारी बैठक घेणार आहेत. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण विषयांसह काही समस्यांवरील उपायांबाबतही चर्चा होणार आहे. 
रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरणाबाबत मंगळवारी बैठक आहे.
त्यामुळे त्या बैठकीआधी बँका आणि वित्त संस्थांसोबत होणार्‍या या बैठकीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसमोरील बुडीत कर्जाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या बैठकीत जानेवारी ते मार्च 2016 या तिमाहीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कामगिरीचे पुनरावलोकन केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकाचे नुकतेच तिमाही आर्थिक निकाल जाहीर झाले आहेत. त्यातून या बँकांना रु. 25 हजार कोटींहून अधिक तोटा झाल्याचे आढळून आले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेचे निकाल देखील समाधानकारक आलेले नाहीत. जेटलींबरोबर होणार्‍या बैठकीत बँकांची बुडीत कर्जे (एनपीए), घसरलेला आर्थिक ताळेबंद, स्टेट बँक आणि त्यांच्या सहयोगी बँकांचे विलीनीकरण अशा विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.