Breaking News

पिंक पँथर व पाटणा पायरेट्सचा विजय

जयपूर, दि. 30 - प्रो कबड्डीच्या दुसर्‍या चरणात जयपूरमध्ये घरच्या मैदानावर चाहत्यांच्या प्रचंड प्रतिसादात जयपूर पिंक पँथर्सने तेलुगू टायटन्सला नमवत प्रो  कबड्डी लीगमध्ये गुणांचे खाते उघडले तर दुसर्‍या लढतीत गतविजेत्या पाटणा पायरेट्स संघाने यू मुंबावर मात केली.
जयपूर आणि तेलुगू दोन्ही संघांनी सलामीची लढत गमावली होती. विजय मिळविण्याकरता दोन्ही संघ आतूर होते. जयपूरच्या संघाने दिमाखदार अष्टपैलू  प्रदर्शनाच्या बळावर 28-24 सरशी साधली. या विजयासह जयपूरने सहा गुणांसह गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे. पाहिल्या हाप मध्ये 12-12 अशा  बरोबरीनंतर जयपूरने 16-15 अशी निसटती आघाडी घेतली. राजेश नरवालच्या यशस्वी चढाईच्या जोरावर जयपूरने 24-17 अशी आगेकूच केली. शेवटच्या  क्षणांमध्ये जसवीर सिंगच्या आक्रमक चढाईच्या जोरावर जयपूरने विजय साकारला.
तर दुसर्‍या अटीतटीच्या सामन्यात पाटणा पायरेट्सने यू मुंबावर 36-34 अशी मात केली. आक्रमण आणि बचाव अशा दोन्ही आघाडयांवर दोन्ही संघांनी  एकमेकांना कडवी टक्कर दिली. तिसर्‍या पर्वाचा हिरो प्रदीप नरवालने 18 गुणांच्या कमाईसह पाटण्याच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. शेवटच्या मिनिटाला  यू-मुबांकडे 1 गुणाची आघाडी होती मात्र शेवटच्या चढाईत प्रदीप नरवालने 2 गुणांची कमाई करत पाटणाला 1 गुणाची आघाडी मिळवून दिली तसेच शेवटच्या  चढाईत अनुप कुमारची पकड करीत जयपूरने सामना 2 गुणांनी जिंकला घरच्या मैदानावर लौकिकाला साजेसा खेळ करू न शकणार्‍या रिशांक देवाडिगाने 11 गुण  मिळवत सूर गवसल्याचे संकेत दिले.