Breaking News

नदीजोड प्रकल्पासाठी मंत्रीच करणार उपोषण

नवी दिल्ली, दि. 08 - केन-बेतवा नदीजोड प्रकल्पाला असलेला पर्यावरणवाद्यांचा विरोध हा राष्ट्रीय अपराध असल्याची टीका केंद्रीय जल संसाधनमंत्री उमा भारती  यांनी केली आहे. या प्रकल्पाच्या उभारणीस विलंब झाल्यास उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशमध्ये पसरलेल्या आणि पाण्याच्या दुर्भिक्षाने त्रस्त असलेल्या बुंदेलखंड परिसरासाठी हा प्रकल्प वरदान ठरणार असल्याचा दावा केला  जातो. या प्रकल्पाचे काम मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यात सुरू होणे अपेक्षित होते. मात्र पर्यावरण मंत्रालयाच्या आवश्यक परवानग्या न मिळाल्याने हा प्रकल्प  रखडला आहे.
या प्रकल्पाला विरोध करणारे कथित पर्यावरणवादी तब्बल 70 लाख नागरिकांच्या आयुष्याशी खेळत आहेत. त्यांचा हेतू लक्षात घेता त्यांचा अपराध हा देशद्रोह  असल्याचे मी म्हणणार नाही; मात्र हा निश्‍चितपणे राष्ट्रीय अपराध आहे; असे मत उमा भारती यांनी व्यक्त केले. या प्रकल्पाचे विरोधक प्रकल्पामुळे होणार्‍या  फायद्याकडे दुर्लक्ष करून दिल्लीच्या वातानुकूलित दालनात बसून विरोध करीत असल्याची टीकाही त्यांनी केली.
पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांना आपला कोणताही विरोध नाही. प्रकल्पांना मंजुरी देण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीमध्ये समावेश असलेल्या पर्यावरणवाद्यांना  आपला विरोध आहे. या समितीने पुढील बैठकीत केन-बेतवा नदीजोड प्रकल्पाबाबत निर्णय घेतला नाही; तर आपण या समितीच्या विरोधात उपोषण करू; असा  इशाराही त्यांनी दिला.