Breaking News

‘भारतीय स्त्री वैवाहिक बलात्काराच्या तक्रारीबाबत उदासीन’

नवी दिल्ली, दि. 08 - भारतात महिलेच्या विरोधाला न जुमानता पतीने केलेला शरीरसंबंध हा बलात्कार ठरविणारा कायदा जरी करण्यात आला; तरी भारतीय  महिला या कायद्यांतर्गत तक्रार करण्यास पुढे येणार नाहीत; असे मत केंद्रीय महिला व बालविकासमंत्री मनेका गांधी यांनी व्यक्त केले.
महिला पत्रकारांच्या कार्यशाळेत बोलताना मनेका यांनी काही महिन्यापूर्वी व्यक्त केलेल्या; ‘वैवाहिक बलात्काराची संकल्पना भारतीय संदर्भात गैरलागू आहे;’ या  भूमिकेचा पुनरुच्चार केला.
घरगुती हिंसेच्या विरोधात महिलांना संरक्षण देणारा कायदा भारतात या आधीपासूनच लागू आहे. या कायद्यामध्येच वैवाहिक बलात्काराचा अंतर्भाव होऊ शकतो.  मात्र या कायद्यानुसार संमतीशिवाय शरीरसंबंध केल्याच्या कारणावरून एकाही महिलेने आजपर्यंत तक्रार केलेली नाही; असे गांधी यांनी निदर्शनास आणून दिले.
आपल्या पतीवर नाराज असलेल्या; त्यांची घृणा करणार्‍या महिला समाजात दिसून येतात. त्यांच्या मनात अगदी पतीला मारून टाकण्याच्या टोकाच्या कल्पनाही  येतात. मात्र त्याचवेळी त्यांना आपल्या दोन मुलांच्या भवितव्याची चिंता सतावते. त्यामुळे तिचा विचार बदलतो आणि मुलांसाठी का होईना; ती स्त्री आपल्या  पतीची पाठराखणच करते; असे गांधी म्हणाल्या.