Breaking News

वाहन चालक, मालकांवर नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हे - रावते

मुंबई, दि. 08 - राज्य सरकारने एक्सप्रेस महामार्गावर पनवेल जवळ झालेल्या अपघातानंतर अपघात रोखण्यासाठी प्रयत्न सुरु केले असून वाहतूक नियमांचे  उल्लंघन करणार्‍या ट्रक आणि बसच्या वाहन चालक आणि मालकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच त्यांचे वाहन परवाने सुद्धा निलंबित केले जातील, अशी  माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली राज्य रस्ता सुरक्षा परिषद समितीची बैठक मंत्रालयात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. वाहनचालकांच्या  चुकीमुळे राज्यातील 85 टक्के अपघात होतात, तर फक्त 15 टक्के अपघात हे तांत्रिक कारणामुळे होतात. वाहनांचे अपघात टाळण्यासाठी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर  महिन्यातून दोन वेळा महामार्ग पोलीस आणि आरटीओ यांच्यामार्फत वाहनचालकांची व वाहनांची संयुक्त तपासणी करण्यात येणार आहे. जेणेकरुन अवैध  वाहतुकीला आळा बसण्यास मदत होईल.
ते पुढे म्हणाले की, यापुढे नव्याने काढण्यात येणार्‍या महामार्गांच्या निविदा प्रक्रियेमध्ये महामार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरा, स्पीड गन, स्पीड कंट्रोल यंत्रणा  उभारण्याच्या तरतुदी करण्यात येणार आहेत. शिवाय एखाद्या लेनवर अपघात झाल्यास वाहनचालकांना त्याची माहिती देणारे इंडिकेटर लावण्यासाठी यंत्रणा  उभारणे, अशा अटी कंत्राटदाराला ठेवण्यात येणार आहेत.