Breaking News

मुंबई-पुणेकरांची टोलमाफी लांबणीवर

मुंबई, दि. 03 -  मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर; तसेच मुंबईच्या पाच प्रवेशद्वारांवरील टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे लांबणीवर पडला असून राज्य सरकारने यासंदर्भात नेमलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांच्या समितीला आणखी मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
राज्य सरकारने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा प्रमुख मुद्दा ठरलेल्या टोलमाफीवर 2015 मध्ये निर्णय घेतला होता. राज्यातील 12 टोल नाके पूर्णतः बंद करून 53 टोल नाक्यांवर हलकी वाहने, एसटी बसेस; तसेच स्कूल बसना टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई, पुणे द्रुतगती मार्गावर आणि मुंबईतील पा
च ठिकाणच्या प्रवेशद्वारांवरदेखील अशाच पद्धतीने टोलमाफी देण्याचा मनोदय जाहीर केला होता. मात्र, यामुळे कंत्राटदाराला द्यायची आर्थिक नुकसानभरपाई आणि आयआरबी कंपनीसोबत केलेल्या करारांची तांत्रिक तपासणी करण्यासाठी राज्य सरकारने गेल्या वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांची समिती नियुक्त केली होती. कुलकर्णी समितीने दोन वेळा मुदतवाढ घेत या वर्षीच्या सुरवातीलाच आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला. समितीने आपल्या अहवालात मुंबई प्रवेशद्वारावरील टोलबंदी व्यवहार्य नसल्याचे नमूद केले होते. तसेच हलक्या वाहनांना टोलमधून वगळल्यास 2021 कोटींची नुकसानभरपाई संबंधित कंत्राटदाराला द्यावी लागेल, असेही समितीने म्हटले होते.