Breaking News

रुईछत्तीशीच्या विकासासाठी गावकर्‍यांनी नैतिक विचारांची कास धरावी - जिल्हाधिकारी कवडे

अहमदनगर, दि. 24 - लोकसहभागातून जलसंधारण ही योजना प्रत्येक गावातील लोकांच्या सहभागातून यशस्वी होत असून, प्रत्येकजण काम करण्यासाठी पुढे येत आहे. रुईछत्तीशीतील भूमिपुत्र, पेन्शनर व बाहेरगांवी नोकरीला असणारी मंडळी यांच्या विचारांतून आपले गाव जलयुक्त शिवार अभिमानात निवडले गेले नाही, म्हणून आपण काहीच काम करायचे नाही का? या विचारा
ने एकत्र येऊन तालुक्यातील रुईछत्तीशी येथे लोकसहभागातून जलसंधारण कामाचा शुभांरभ जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी अण्णासाहेब पाडळकर होते.
रुईछत्तीशी (ता. नगर) गावास जिल्हाधिकारी डॉ. अनिल कवडे यांनी लोकसहभागातून जलसंधारण या कामाच्या उद्घाटनप्रसंगी गावाला पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीची व विविध कामांची पाहणी केली. यावेळी श्री. कवडे बोलत होते. याप्रसंगी आदर्शगाव समितीचे राज्याचे अध्यक्ष पोपटराव पवार, जि. प. सदस्य बाळासाहेब हराळ, तहसीलदार सुधीर पाटील. जयश्री दरदंले, सरपंच प्राजक्ता भांबरे, उपसरपंच दीपाली गोरे, प्रभाकर भांबरे, रमेश भांबरे, सर्कल जाधव साहेब, तलाठी वृषाली सारसर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
कवडे म्हणाले की, शाश्‍वत शेतीसाठी पाणी व पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी रुईछत्तीशीतील ग्रामस्थांनी लोकसहभागातून सुरू केलेली जलसंधारण चळवळ राज्याला मार्गदर्शक ठरेल. प्रत्येकाने शुद्ध मनाने, सात्त्विक आचरणाने व व्यापक समाजहिताचा विचार करुन गावातील राजकारण बाजींला ठेवून गावच्या सर्वांगीण विकासासाठी नैतिक विचारांची कास धरावी. जलसंधारणाबरोबर जलसंवर्धन, वृक्षारोपण, विहीर, बोअरवेल व इमारतीचे छतावरील पाण्याचे पुर्नभरण, वनसंवर्धन, श्रमदान, स्त्री जन्माचे स्वागत, व्यसनमुक्ती, भुजल अधिनियमांचे पालन, कामधेनू योजनेंतर्गत पशुसंवर्धन व इतर योजनांची त्यांनी सविस्तर माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, पाण्याचे योग्य नियोजन करुन तुषार व ठिबक सिंचन योजना राबवावी. तन-मन-धनाने गावाने एकी करुन राजकारण बाजूला ठेवत एकत्र राहण्याची गावकर्‍यांची जबाबदारी आहे.  जलसंधारणच्या कामासाठी शासनाच्या कुठल्याही खात्याची मदत लागल्यास सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे सांगितले.
पोपटराव पवार म्हणाले की, भविष्याचा वेध घेऊन पाण्याचे उत्तम नियोजन केले, तर ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावरील घागर व मुलींच्या डोक्यावरील पाण्याच्या हंड्याचे ओझे कमी होईल. यासाठी गावात जलसंधारणचे छोटे-छोटे प्रकल्प उभारा, तसेच नुसते काम करुन न थांबता त्या केलेल्या कामाचे मूल्यमापन  करताना गावातील बोअरवेल, विहिरीच्या पाण्याची पातळी यांची वेळोवेळी नोंद ठेवा, केलेल्या कामाचे गावानेच सामाजिक ऑडिट करावे व जलसंवर्धन करण्यासाठी गावकर्‍यांनी जमिनीला फ्लोने पाणी न देता जास्तीत जास्त सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करावे, असे सांगितले.