Breaking News

केंद्र सरकार करत आहे संविधान बदलण्याचा प्रयत्न

सांगली, दि. 06 -  एकीकडे मोठ्या उत्साहात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करायची आणि दुसरीकडे त्यांनी लिहिलेले संविधान बदलण्याचा प्रयत्न करायचा, असा डाव केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने रचला आहे. हे सरकार या देशाला केवळ हिंदू राष्ट्र बनविण्याचा एकमेव अजेंडा राबवित असल्याने या देशाती
ल सर्वसामान्यांची स्थिती गंभीर झाली असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरो सदस्या माजी खासदार श्रीमती वृंदा करात यांनी केला आहे.
सांगली येथील स्टेशन चौकात जनवादी महिला संघटनेच्या राज्य अधिवेशनानिमित्त आयोजित जाहीर सभेत श्रीमती वृंदा करात बोलत होत्या. महिला आपल्या कर्तृत्वाने सध्या प्रत्येक क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करीत आहेत. मात्र या महिलांनी घरकामातच अडकून रहावे, ही मानसिकता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपची असून वास्तविक या देशातील 35 टक्के कुटुंबे या महिलांवर अवलंबून असतानाही महिलांचे महत्त्व समजून घ्यायला ते तयार नाहीत. त्यामुळे महिला आंदोलनांना त्यांच्याकडून धोका असून संघ व भाजपचे लोक माफियासारखे वागत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
बड्या भांडवलदार व काळ्या पैसेवाल्यांच्या इशा-यावरच केंद्र व राज्यातील भाजप सरकार काम करीत आहे. राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा भ्रष्टाचार दर सहा महिन्याला सामोरा येत आहे. भाजपचे नेते एकनाथ खडसे हे नक्की राज्याचे की कुटुंबाचे महसूलमंत्री होते, असा प्रश्‍न उपस्थित करून त्यांच्या गत दीड वर्षातील मंत्रिपदाच्या कारकीर्दीची विशेष सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.