। प्रांताधिकारी, तहसीलदार, आमदारांकडून पाहणी । आपत्कालीन निवारण कक्ष सुरू
तिसगाव । प्रतिनिधी । 08 - पाथर्डी तालुक्यात पाऊस व वादळी वार्यामुळे तिसगाव परिसरात घराचे पत्रे, विजेचे खांब, झाडे उन्मळून पडली, कांद्याच्या चाळीचेही पत्रे उडाल्याने मढी-शिरापूर-निवडूंगे, वृध्देश्वर कारखाना, कासार पिंपळगाव येथे मोठया प्रमाणात नुकसान झाले. रविवारी रात्री जोरदार वार्यासह पावसाने परिसरात थैमान घातले होते. मढी येथील कानिफनाथ आश्रम शाळेच्या वसतिगृहाच्या इमारतीचे पत्रे उडून गेले. हरिभाऊ काळदाते, जालिंदर मरकड, लक्ष्मण मरकड, छबु आरोळे, विजू साहवे, शामराव मरकड, गणेश मरकड, मुरलीधर मरकड यांच्यासह अनेक शेतकर्यांच्या घराचे पत्रे उडून गेले. दीपक साळवे यांच्या आश्रमशाळेच्या इमारतीच्या पत्र्यासह मोठया प्रमाणात नुकसान झाले. शिरापूर येथे विठ्ठल लवांडे यांच्या राहात्या घरावर चिंचेचे झाड कोसळल्याने तीन खोल्या भूईसपाट झाल्या. तिसगाव परिसरातील वाड्या वस्त्यांवर पाऊस व वादळी वार्याने मोठया प्रमाणात नुकसान झाले. आज सोमवारी सकाळी प्रांताधिकारी श्रीमती ज्योती कावरे, तहसीलदार श्रीमती सुनीता र्जहाड, आमदार मोनिका राजळे, तालुका कृषी अधिकारी किरण मोरे, पाथर्डी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉ. हरीचंद्रे, सर्कल, तलाठी यांच्या संयुक्त पथकाने तालुक्यात वादळामुळे झालेल्या नुकसानीची पहाणी केली. वृध्देश्वर कारखान्यावरील तालुका दूध संघाच्या इमारतीचे पत्रे उडाले. वृध्देश्वर कारखान्याच्या गोडावूनची भिंतही कोसळली, तर न्यू इंग्लिश स्कूलच्या संगणक कक्षाच्या इमारतीवर झाड कोसळल्याने संगणकाचे नुकसान झाले. दोन खोल्यांचे पत्रे उडून गेले. नामदेव फुलारी, सुधीर भगत, जगताप यांच्या राहत्या घराचे पत्रे उडून गेले. अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर उन्मळून पडली. ठिकठिकाणी वादळी वार्यामुळे विजेचे खांब, वीजवाहिन्या, टेलीफोनचे खांब तुटून पडले. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. प्रांताधिकारी ज्योती कावरे यांनी नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना कराव्यात. प्रशासनाने आपत्कालीन मदत कक्ष तहसील कार्यालयात सुरु केला असून, सर्कल व तलाठी यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले. यावेळी जि.प.सदस्या योगिता राजळे, मढी देवस्थानचे अध्यक्ष शिवशंकर राजळे, कासार पिंपळगावचे उपसरपंच राहुल राजळे उपस्थित होते.