शिरूर -नगर महामार्गाच्या दुतर्फा वृक्षारोपण
सुपा । प्रतिनिधी । 08 - पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण गावातून जाणार्या महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे व नगर- शिरूर महामार्गालगत वृक्षलागवड व्हावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी चार दिवस केलेल्या आंदोलनाला यश आले असून, नुकतीच नारायणगव्हाण येथून रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपणास प्रारंभ करण्यात आला आहे. तसेच या गावातील रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी जिल्हाधिकार्यांनी आदेश दिले असून, त्या नुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता डोंगरे , सुपा पोलिस निरीक्षक शामकांत सोमवंशी व ग्रामस्थ यांच्यात झालेल्या संयुक्त बैठकीनुसार ग्रामस्थांनी दोन्ही बाजूने 11 मीटर हद्द संपादित करण्याची व डोंगरे यांनी केलेल्या पोलिस संरक्षणाची मागणी, याला सर्वानुमते मंजुरी मिळाली. त्यानुसार दुसर्या दिवशी गावामध्ये रस्त्याच्या सेंटरपासून दोन्ही बाजूला 11 मीटरवर खुणा करण्यात आल्या. या वेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. मोजणीनंतर लगेच सा. बां.विभाग,चेतक इंटरप्रायजेस यांच्या विद्यमाने वृक्षारोपणास प्रारंभ करण्यात आला. या वेळी शरद पवळे,सुनील भंडारी,शहाजी शेळके,विलास खोले,सीताराम शेळके,बाळासाहेब शेळके,नितीन भंडारी,अभियंता डोंगरे दिवटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
