‘जानवे’ विरूद्ध ‘दानवे’
भाजपामध्ये प्रामुख्याने दोन गट स्पष्टपणे दिसून येत आहे. भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या विचारधारेवर चालणारां, आणि भाजप म्हणजे आपण असल्याच्या अविर्भावात वागणारा एक जानवे घालणारा गट तर दुसरीकडे भाजपामध्ये बहुजन असणारे कार्यकर्ते असा एक गट बघायला मिळतो. अर्थात महाराष्ट्रातील या गटाचे नेते दानवे असल्यामुळे जानवे विरूद्ध दानवे असा संघर्ष नेहमीच बघायला मिळत आहे, त्यातूनच महाराष्ट्रातील खडसे प्रकरण उभे राहिलेले दिसते. ते याच संघर्षाचा भाग म्हणायला हरकत नाही.भारतीय जनता पक्षातील व महाराष्ट्र राज्यातील महुसलमंत्री, कृषीमंत्रीपदी असणारे नाथाभाऊ म्हणजेच एकनाथ खडसे. काही दिवसांपासून नाथाभाऊवर एकसारखी आरोपांची राळ उठत आहे, चहुबाजूंनी आरोपांची राळ डठत असल्यामुळेच की काय नाथाभाऊंनी अखेर राजीनामा दिला, की तो देण्यासाठी नाथाभाऊवर पक्षक्षेष्ठींनी दबाव आणला हे त्यांनाच ठाऊक. भारतीय जनता पक्षाचा इतिहास बघितला असता, पक्ष संघटन वाढवायला नेहमीच बहूजन समाजातील व्यक्तींची मदत घेतली जाते, कारण सत्ता मिळवण्यास नेहमीच बहुजन चेहरा भाजपासाठी फायदेशीर ठरतो हे एव्हानां भाजपाला चांगलेच ठाऊक झाले आहे. मात्र बहुजन व्यक्तीमुळे पक्षांची प्रतिमा मलिन होवू नये यासाठी प्रसंगी बहुजन व्यक्तीला अलगद दूर सारायचे हे कसब भाजपाने चांगलेच अवगत केले आहे, त्यामुळे नाथाभाऊंनी पत्रकारपरिषदेत नितीन गडकरी, लालकृष्ण अडवाणी यांच्यावर ही आरोप झाले होते, त्यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा देवून चौकशीला सामोरे गेले होते, असे जरी सांगितले होते, तरी भाजपाचे चौकशीला गेलेले नेते हे बहुजन नव्हते याचा विसर बहुतेक नाथाभाऊंना पडला असावा. आज भाजपामध्ये बहूजनविरूद्ध संघ असे दोन गट उघडपणे पडलेले दिसतात, मात्र अजून त्याचा वणवा पेटलेला नाही. नैतिकतेच्या गप्पा मारणार्या भाजपाला यापूर्वी आपल्या पक्षातील नैतिकता दिसली नाही का? मात्र नैतिकेतेने नेहमीच बहूजन समाजातील व्यक्तींचा बळी घेण्याची संघाची भूमिका नेहमीच राहिली आहे. खडसे यांनी जर काही बेकायदेशीर कृत्य केले असेल तर ते चौकशीतून स्पष्ट होईलच. आणि त्यांची शिक्षा ही त्यांना भोगावी लागेलच. मात्र त्यामुळे खडसेविषयी काही दिवसांपासून विरोधकांकडून म्हणण्यापेक्षा स्वकियाकडूनच जे खाद्य प्रसारमाध्यमांना पुरविले त्यातून खडसे विषयी एक द्वेषाची भावना निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत. मात्र खडसेंनी हा प्रकार फार पुर्वीच लक्षात घ्यायला हवा होता. अर्थात खडसे यांच्यावर आरोप गंभीर आहेत, मात्र तितकेसे ते स्पष्ट देखील नाहीत. त्यामुळे खडसे यांची चौकशी होणार हे तितकेच उघड होते. खडसे यांच्यावरील आरोप निश्चितपणे गंभीर आहेत आणि त्यांनी यापूर्वीच राजीनामा द्यायला पाहिजे होता. मात्र, खडसे भाजपमधील आणि बहुजन समाजाचे मोठे नेते आहेत. गेल्या काही दिवसांत खडसेंच्या इभ्रतीचे ज्याप्रकारे धिंडवडे काढण्यात आले, त्यावरून भाजप बहुजन समाजाच्या नेत्यांना लक्ष्य करत आहे, असेच चित्र असल्याचा सुर नारायण राणे यांनी देखील आज आळवला आहे.भाजपकडून गेल्या काही दिवसांत बहुजन समाजाच्या नेत्यांवर ठपका ठेवणे आणि त्यांच्यावर आरोप करण्याचे प्रकार सातत्याने होत आहेत. एका बाजूला देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांसमोर खडसेंना क्लीन चीट देतात आणि दुसरीकडे पक्षाकडे खडसे यांच्यावर कारवाई करण्यासाठी आग्रह धरतात. खडसे यांच्यासारख्या नेत्याचे इतके धिंडवडे काढण्याची गरज नव्हती. त्यापेक्षा यापूर्वीच त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे होता, या नारायण राणे यांच्या मताशी अवघ्या बहूजन समाजाने सहमत असणे अगदीच गैर नाही.
