दुभाजकांवर विविध झाडे लावुन संगोपन करण्याचा निश्चय
। सामाजिक जाणिवेतून सुरु असलेले एल अॅण्ड टी कंपनीचे कार्य कौतुकास्पद व अनुकरणीय असे - महापौर कळमकर
अहमदनगर, दि. 07 - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एल अॅण्ड टी कंपनीने महानगरपालिकेच्या सहकार्याने पाईपलाईन रस्त्यावरील सुमारे अडीच किमी परिसरातील दुभाजकावर विविध झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचा शुभारंभ महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते व माजी आ.दादाभाऊ कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक संपत बारस्कर, कंपनीचे जॉ.जन.मॅनेजर अरविंद पारगांवकर, सभागृहनेते कुमार वाकळे, युनियनचे अध्यक्ष किरण देशमुख, सेक्रेटरी बाबुराव काळे, मानव संसाधन विभागाचे प्रमुख नागेशचंद्र आढाव आदि मान्यवर याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला नागेशचंद्र आढाव यांनी प्रास्तविक करुन आजपर्यंत लार्सन अॅण्ड टुब्रो कंपनीने नगर शहराच्या स्वच्छतेसाठी, हरितकरण करण्यासाठी तसेच चौकाच्या सुशोभिकरणासाठी मोठे योगदान दिलेले असून, शहीद भगतसिंग उद्यान, सिग्नल व्यवस्था, आर्मी गार्डन, गरजु शाळांमध्ये स्वच्छ पाण्याची व्यवस्था, मोबाईल प्रयोग शाळा आदि विविध उपक्रमाच्या माध्यमातून आपले कार्य सुरु ठेवले असून, यासाठी महापालिकेने वेळोवेळी दिलेल्या सहकार्याचा उहापोह केला.
कंपनीचे जॉ.जन.मॅनेजर अरविंद पारगांवकर यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून यंदाच्या वर्षी लार्सन अॅण्ड टुब्रो कंपनी 5 हजार झाडे नगर शहर व परिसारात लावणार असून, या झाडांचे संगोपन करण्याची तयारीही स्विकारली आहे व ती निश्चितपणे अवलंबली जाईल. लवकरच महापालिकेच्या सहकार्याने नेप्ती चौकाचेही कंपनीच्यावतीने सुशोभिकरण करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे, असे सांगून जागतिक पर्यावरणाच्या दिवशी सर्वांनी एकतरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, तरच खर्या अर्थाने जागतिक पर्यावरण दिन साजरा होईल, असे सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या. महापौर कळमकर म्हणाले, लोकसहभाग, कंपन्यांचा सहभाग व युवकांचा सहभाग यावरच पर्यावरणाचे सर्व कार्य अवलंबून असून, यामध्ये अभिमानास्पद असे कार्य आपणा सर्वांकडून अपेक्षित आहे. लार्सन अॅण्ड टुब्रो कंपनीने एक स्त्युत्य असा अडीच किमी पर्यंत वृक्षारोपण करुन ती झाडे जगवण्याचीही जबाबदारी उचलली आहे. अतिशय कौतुकास्पद व अनुकरणीय असे काम असून, नगरमधील इतर कंपन्यांकडून त्याचे अनुकरण व्हावे, यासाठी अहमदनगर महानगपालिकेच्या माध्यमातून सर्वोतोपरि सहकार्य करण्याची आश्वासन त्यांनी दिले.
