Breaking News

सावेडी परिसरात वर्षभरात 1200 झाडे लावणार ः डॉ.कांडेकर

अहमदनगर, दि. 07 - हरितनगर करावयाचे असल्यास यामध्ये लोकसहभाग हा अत्यंत मह्त्वाचा घटक आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व नागरिक यांनी पुढाकार घेतल्यास हरितनगर होणे शक्य आहे. कुठलाही उपक्रम यशस्वी करावयाचा असेल, तर त्यासाठी जनजागरण होणे गरजेचे आहे. सामाजिक उपक्रमात जनतेचा सहभाग असल्याशिवाय हा उपक्रम यशस्वी होऊ शकत नाही. पर्यावरण ही व्यापक संकल्पना आहे. निसर्गाचे आपण शत्रु असून, आपण त्याचा र्‍हास करीत आहोत. प्रत्येक नागरिकाचे भावनिक नाते जागृत व्हायला हवे. ‘नोबल’सारख्या अशा काही संस्था आहेत, की त्यांना सामूहिक पाठिंबा देणे गरजेचे आहे. इमारती खूप सुंदर आहेत, पण इमारतीसमोर पर्यावरण संतुलन करणार्‍या गोष्टी नाहीत, ही खेदाची बाब आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एशियन नोबल हॉस्पिटल प्रा.
लि. व सामाजिक वनीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सावेडीतील रामेश्‍वर मंदिर परिसरात श्री. कवडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी हॉस्पिटलचे संचालक डॉ. बापूसाहेब कांडेकर, महापौर अभिषेक कळमकर, स्थायीचे सभापती गणेश भोसले, दादा कळमकर, उपसंचालक चंद्रकांत तांबे, राजेश पाटील, डॉ. पांडुरंग डौले, डॉ. गाडे, संगीता कांडेकर, डॉ. श्याम तारडे, बलभीम डोके, राहुल हिरे, डॉ. राकेश गांधी आदी उपस्थित होते.
कवडे पुढे म्हणाले की, आपल्या पूर्वजांनी जी झाडे लावली, त्यावर आपण जगत आहोत. आपण झाडे लावली, तर आपली पुढील पिढी जगेल. प्रत्येकाने दुसर्‍याचा विचार करायला हवा. परसबाग योजना विलीन होत चालली आहे. झाडे ही सजीव आहेत, त्यांना जगू द्या. वृक्ष संवर्धनात प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. महापौर कळमकर म्हणाले की, सामाजिक उपक्रमात नोबल हॉस्पिटल चांगली भूमिका पार पाडत आहे. वृक्षारोपण करण्याचा त्यांनी हाती घेतलेला उपक्रम नक्कीच स्पृहणीय असून, प्रेरणा देणारा आहे. यापुढील काळात बांधकामांना परवानगी देताना नियम अधिक कडक करण्याची गरज आहे. ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम प्रत्येकजण भोगत आहेत. पर्यावरण संतुलनासाठी वृक्षसंवर्धन व्हायला हवे, असे ते म्हणाले. डॉ. कांडेकर म्हणाले की, सावेडी परिसरात ‘नोबल’च्या माध्यमातून ओपन स्पेस व इतर ठिकाणी दर महिन्याला शंभर अशी वर्षभरात 1200 झाडे लावण्याचा संकल्प आम्ही केला आहे. हा संकल्प तडीस नेण्यासाठी स्वतंत्र पाण्याचा टँकर, तसेच झाडे जगवण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी (माळी) नियुक्त केला आहे.