Breaking News

कराडात मुसळधार पावसाने पाणीच पाणी

कराड, दि. 5 (प्रतिनिधी) : ढगाळ वातावरणासह उकाड्याने हैराण झालेल्या कराडकरांना सायंकाळी सुरू झालेल्या मुसळधार पावसाने दिलासा दिला. कराड, मलकापूर, विद्यानगरसह परिसरात पडलेल्या मुसळधार पावसाने रस्त्यावर पाणी साचले होते. कराड बसस्थानकाचे काम सुरु असल्याने सध्या बसेस उभ्या राहत असलेल्या जागेवर पाणी साचल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
सकाळपासून ढगाळ वातावरण होते. ढगाळ वातावरण होते तरीही नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. काही भागात उन्हाचा तडाखा जाणवत होता. दुपारनंतर सर्वत्र ढगाळ वातावरण झाले तर चारनंतर सोसाट्याच्या वार्‍यासह पावसाच्या सरीं कोसळल्या. कराड तालुक्यातील कराड शहर, मलकापूर, आगाशिवनगर, विद्यानगरसह परिसरात पावसाने चांगलाच जोर धरला. सुमारे तासभर मुसळधार पाऊस सुरू होता. पावसाने जनजीवन काही प्रमाणात विस्काळीत झाले. शहरात रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली. रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहिल्याने बसस्थानकालात तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. पहिल्या पावसाने रस्त्यांची अवस्था बिकट केली.