Breaking News

झोपडपट्टीवासियांना खा. उदयनराजे यांच्या हस्ते फ्लॅटचा ताबा

सातारा, दि. 18 -  सातारा शहरात झोपड्यांमध्ये राहणार्‍या नागरिकांना हक्काचे घर मिळावे, असे आपले स्वप्न होते. अल्पशा दरात या लोकांना आपण घरे देऊ शकलो, याचे समाधान आहे. या माध्यमातून पाच वर्षांची स्वप्न पूर्ती झाली, असे प्रतिपादन सातारचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले. दरम्यान, यावेळी 300 लाभार्थ्यांना घरकुलाची देण्यात आली. सातारा नगरपालिकेच्या छ. शिवाजी सभागृहात लक्ष्मी टेकडी परिसरातील झोपडपट्टीवासीयांना घरकूल चावी देण्यात आली.  
खा. उदयनराजे म्हणाले, लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर येथील रहिवाशांना हक्काचे घर मिळावे, असे स्वप्न पाहिले होते. ते पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून घरकूल योजना मंजूर करून कोट्यवधींचा निधी आणला. लक्ष्मी टेकडी परिसरात गेल्या तीन वर्षांपासून या योजनेचे काम सुरू असून, किरकोळ काम वगळता योजना पूर्ण झाली आहे. महागाईच्या जमान्यात घराच्या किमती गगनाला भिडत असताना या योजनेंतर्गत पालिकेने अवघे तीस हजार रुपये भरून घेऊन त्यांना हे घर देऊ केले आहे. यामध्ये 400 स्न्वेअर फुटाचे घर 1 हजार 673 कुटुंब मिळणार आहे. अल्पशा दरात या गोरगरीब लोकांना घर देऊ शकलो, याचे मला समाधान आहे. या लोकांप्रमाणेच सातारा शहरातील इतर वंचित लोकांनाही घर मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे खा. उदयनराजे यांनी स्पष्ट केले.