Breaking News

स्टेट बँकेत पाणी घुसल्याने कामकाज ठप्प

फलटण, दि. 8 (प्रतिनिधी) : फलटण येथील भारतीय स्टेट बँकेच्या शेती शाखेच्या कार्यालयात पावसाचे पाणी घुसल्याने बँकेचे कामकाज बंद ठेवावे लागले. त्यामुळे परिसरातील ग्राहकांची गैरसोय झाली.  
फलटण येथे स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखा संत ज्ञानेश्‍वर मंदिराच्या जागेत मुख्य रस्त्यावर दुमजली इमारतीमध्ये आहे. दुसरी शेती शाखा फलटण-लोणंद रस्त्यावर तळ्यातील देवी मंदिरासमोर दुमजली इमारतीत तळमजल्यावर आहे. रात्रीच्या वेळी झालेल्या पावसाने बँकेच्या शेती शाखेच्या इमारतीच्या तळमजल्या समोरील मोकळ्या जागेत प्रचंड पाणी साठले होते. दरम्यान, बँकेचे
अधिकारी व कर्मचारी बँकेत आल्यावर बँकेचा दरवाजा उघडल्यानंतर बँकेत आतमध्ये पाणी साठल्याचे त्यांच्या लक्षात आले. साधारण 6 ते 8 इंच पाणीसाठा असल्याने बँकेचे फर्निचर पाण्यात होते. मात्र, बँकेची कोणतीही कागदपत्रे अथवा अन्य रेकॉर्डचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे बँकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. या ठिकाणी साठलेल्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने पाणी आतमध्ये शिरले. परिणामी बँकेचे कामकाज ठप्प झाले होते. सलग तीन दिवस बँकेचे कामकाज बंद राहिल्याने अनेक ग्राहकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागले.