Breaking News

मुंबईचा पाण्याचा प्रश्‍न गंभीर

1 महिना पुरेल एवढाच पाणीसाठी 

मुंबई, दि. 18 - मुंबईला पाणीपुरवठा करणा-या सर्व धरणांमधील पाण्याचा साठा दिवसेंदिवस आटत असून महापालिकेत चिंतेचे वातावरण पसरले आहे. शहराला  पाणीपुरवठा करणा-या भातसामध्ये 16 दिवस आणि वैतरणा धरणात 21 दिवसांचा पाणीसाठा आहे. जूनची 17 तारीख उलटून गेली तरी पावसाचा पत्ता  नसल्याने मुंबईकरांना पाणीपुरवठा कसा करायचा असा मोठा प्रश्‍न पडला आहे. त्यामुळे येत्या 15 दिवसांत मुसळधार पावसाचे आगमन न झाल्यास या धरणांमधील  राखीव पाणी उचलण्याची वेळ महापालिकेवर येणार आहे.
मुंबईला अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, भातसा आणि मध्य वैतरणा धरणांमधून 370 कोटी लिटर पाणीपुरवठा रोज केला जातो. परंतु  मागील वर्षी धरण क्षेत्रात कमी पाऊस पडल्यामुळे पाण्याचा साठा घटला. त्यामुळे ऑगस्टपासून सुरू केलेली पाणीकपात अजूनही कायम आहे. पाणीपुरवठयामध्ये  15 टक्के आणि वेळेत 20 टक्के पाणीकपात करण्यात येत आहे. त्यामुळे दरदिवशी 344 कोटी लिटर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु त्यातील 17 कोटी  लिटर पाणी ठाण्यासह अन्य शहरांना दिले जात असल्याने सध्या 327 कोटी लिटर पाणी मिळत आहे. त्यामुळे मुंबईकरांची तहान जूनपर्यंत भागवणे शक्य झाले.
मुंबईला पाणीपुरवठा करणा-या दोन प्रमुख धरणांपैकी भातसा आणि वैतरणा धरणांमध्ये अनुक्रमे 16 व 21 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा असल्याची माहिती  अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन आणि जलअभियंता अशोककुमार तवाडिया यांनी स्थायी समितीला दिली. सध्याचा पाणीसाठा कमी दिसत असला तरी राखीव  साठयातील 50 टक्के पाणी उचलले जाणार आहे. त्यामुळे 31 जुलैपर्यंत पाणी पुरेल इतका साठा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे 2009-10नंतर  प्रथमच राखीव साठयातील पाणी उचलण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. स्थायी समितीत काँग्रेसचे नगरसेवक आसिफ झकेरिया आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे  धनंजय पिसाळ यांनी पाणी समस्येबाबत मुद्दे उपस्थित करत जर पाऊस नाही पडला तर महापालिकेकडे काय उपाययोजना आहे,अशी विचारणा केली. त्यावर  2016चा 17 जूनपर्यंतचा पाणीसाठा : 10 हजार 832 कोटी लिटर.
राज्यातही चिंताजनक पाणीपरिस्थिती
तारीख पे तारीख देणा-या पावसाने यंदाही डोळे वटारले असताना राज्यातील जलाशयांत केवळ 9 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाडा (1 टक्का), कोकण  (29 टक्के), नागपूर (17 टक्के), अमरावती (10 टक्के), नाशिक (9 टक्के), पुणे (7 टक्के) या सगळ्याच विभागांत पाणीसाठयाची स्थिती चिंताजनक आहे. काही  भागांत झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील शेतीच्या कामांना सुरुवात झाली असली तरी मान्सून अद्याप सुरू झालेला नाही. यामुळे राज्यातील बहुतेक भागांत  पेरण्या थांबवून शेतकरी पावसाची वाट पाहात आहे.