Breaking News

संत विचारांचे वारकरी व्हा

हिंदु बहुजनांच्या अध्यात्म आणि धार्मिकतेमधील मुलभूत फरक ब्राह्मणी संस्कृतीने व्यवस्थित उलगडू दिला नाही. मुलत: येथिल मुळ रहिवाशी असलेला हिंदु  बहुजन हा सांस्कृतिकदृष्ट्या जगाच्या कोणत्याही संस्कृतिपेक्षा अधिक पुढे आहे. शेती आणि निसर्ग या दोन गोष्टिंभोवतीच या समाजाची संस्कृति विणलेली आहे.  याउलट ब्राह्मणी संस्कृती ही पशु-पालनाच्या व्यवसायातून पुढे आलेली असल्यामुळे तिच्यात निसर्गसंपन्नता नाही. त्यामुळे प्रत्येक बाबीत भेदाभेदाची मुल्ये त्यांनी  अधिक प्रकट केली आहेत. आज हिंदु बहुजन पंढरपूरच्या वारी करतात. आपआपल्या गावातून वारीसाठी निघाल्या आहेत. आषाढी आणि कार्तिकी अशा दोन  एकादशींच्या निमित्ताने वारकरी संप्रदाय असलेला हिंदु बहुजन विठोबाच्या दर्शनाला पंढरपूरला जाण्यासाठी पायीच निघतो. या दोन एकादशींच्या मध्ये विशेष संबंध  आहे. आषाढी एकादशीनिमित्त पावसाला चांगली सुरुवात होते त्यामुळेच सुखावलेला वारकरी संप्रदायातील शेतकरी त्या आनंदात विठोबाकडे कृतज्ञ भावाने जात  असतो तर कार्तिकीएकादशीला शेतीचा हंगाम चांगला झाल्यानंतर शेतकरी वारकरी म्हणून विठोबाच्या दर्शनाला निघतो. पाऊते हंगाम अशी शेतीशी निगडीत  असणारी संपन्न संस्कृती हिच हिंदु बहुजनांची खरी संस्कृती आहे. यात निसर्ग आणि अध्यात्म याचे बेमालुम मिश्रण आहे. विठोबाच्या दर्शनासाठी अध्यात्माची  लागलेली ही ओढ सर्वच धर्मातील बहुजनांच्या समावेशाची असते. त्यामुळेच ब्राह्मणी संस्कृतीला अध्यात्माची चिड आहे की काय? कारण हिंदु बहुजन समाजाला  अध्यात्माकडे नेण्याऐवजी धर्मांधाकडे नेण्याचा ब्राह्मणी व्यवस्थेचा कल हा नेहमीच दिसून आला आहे. या द्वंदामध्ये पंढरीच्या दिशेने जाणार्‍या वारकर्‍यांच्या दिंड्यशा  देखिल विभक्त झालेल्या दिसत आहेत. ब्राह्मणी संस्कृतीने उभे केलेले वारकरी केवळ माऊली माऊली करत विठोबाला केवळ देवत्व बहाल करतात. तर हिंदु  बहुजनांच्या वारकरी दिंडीमध्ये संत शिरोमणी तुकाराम महाराजांपासुन तर सर्व संतांचे अभंग मनोभावे गात विठोबाच्या दर्शनाची आस व्यक्त करत असतात. हिंदु  बहुजनांच्या दिंड्या या संतांच्या समतेचा विचार गावोगावी मांडत पुढे जातांना दिसतात तर ब्राह्मणी संस्कृतीनेच अलीकडेच उभा केलेला तथाकथित गट विठोबाचे  देवत्व गुणगाण करत पुढे जात असतो. त्यांच्या ठायी संत विचारांना महत्त्व नाही. संतांचा विचार हा मुलत: समतेचा क्रांतीकारी विचार आहे. या क्रांतीकारी  विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठीच संतांच्या नेतृत्वात बहुजन समाजा पंढरपुराकडे प्रस्थान करीत असतो. त्यामुळेच वेगवेगळ्या संतांच्या समाधीपासुन किंवा  गावापासुन निघणार्‍या दिंड्यांचे महत्व आजही टिकून आहे. परंतु प्रसार माध्यमांनी केवळ ब्राह्मणी संस्कृतींच्या प्रभावत अलीकडेच निर्माण केलेल्या दिंड्यांचे  गुण-गाण फक्त सुरु ठेवले आहे. यामुळे समतेचे आदर असलेल्या संत चळवळींची परंपरा कुंठीत केली जात आहे शिवाय ग्रामिण भागातून येणारा पारंपारिक  वारकरी हा अध्यात्मिक समतेचा उपासक बनविण्याऐवजी त्याला धार्मिक डोस पासण्याचे काम केले जात आहे. कोणताही धार्मिक विचार हा मानव समाजाच्या  समतेचा विचार करणारा असेल तर तो निश्‍चितपणे स्विकारार्ह असतो. परंतु अशाप्रकारचा विचार ब्राह्मणी संस्कृतीकडून मांडला जात नाही. पंढरपूरच्या वाटेवर  असणार्‍या दिंड्या ब्राह्मणी अब्राह्मणी अशा परिघात येवून गेल्या आहेत. त्यामुळे आता बहुजन समाजाने या सर्व बाबींना समजून घेवून खर्‍या अर्थाने तुकोबाचे  विचार मांडत जाणारे समतावादी वारकरी होण्याचा प्रयत्न कायम ठेवावा हीच संतांच्या प्रति आपली खरी श्रध्दा आणि निष्ठा ठरेल.