हितसंबंध जपण्यासाठी क्षेत्रीय अभियंत्यांना ‘क्लिन चिट’ देण्याचा शकूनी प्रयत्न
सार्वजनिक बांधकाम : जोशी-तामसेकरांकडून देबडवार-पाटील-चव्हाण-हांडे टोळीला अभय
मुंबई, विशेष/प्रतिनिधी, दि. 29 - सार्वजनिक बांधकाम खात्यातील देबडवार-चव्हाण, हांडे, पाटील टोळीच्या कारस्थानाला सचिव पातळीवरील उच्चपदस्थांचाच पाठींबा असल्याची शंका व्यक्त होऊ लागली आहे. परिणामी क्षेत्रीय अभियंत्यांनी उभे केलेल्या भुजबळ क्लिन चिट अहवाल प्रकरणी संशयाची सुई साबांसचिव चंद्रकांत जोशी आणि सखाराम तामसेकर यांच्यावरच रोखली गेली आहे.महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी माजी साबांमंत्री छगन भुजबळ अडचणीत आल्यानंतर त्यांच्यावर आलेली बला टाळण्यासाठी मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण, अधिक्षक अभियंता रणजीत हांडे, कार्यकारी अभियंता किशोर पाटील या क्षेत्रीय अभियंत्यांनी भ्रष्टाचाराच्या मिठाला जागण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण भुजबळांमुळे नव्हे तर मंत्रीमंडळांच्या पायाभूत समितीच्या इशार्यावर घडले आहे. असा बनाव करून भुजबळ यांना मि. क्लिन चिट ठरविणारा अहवाल या क्षेत्रीय अभियंत्यांनी मॅनेज केला. मात्र तपास यंत्रणेच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न तोंडघशी पडला.
इकडे भुजबळ कारवाईच्या गर्तेत अडकत गेले. मात्र भुजबळांच्या पापात सहभागी असणार्या क्षेत्रीय अभियंत्यांनी त्यांना निर्दोष ठरविण्यासाठी केलेली अक्षम्य चुक उघड झाल्यानंतरही अपराधी क्षेत्रीय अभियंत्यांवर अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही. यासंदर्भात सखोल शोध घेण्याचा प्रयत्न केला असता गंभीर दखल घ्यावी से सत्य बाहेर आले आहे. या क्षेत्रीय अभियंत्यांना वाचविण्यासाठी विद्यमान साबां सचिव सी.पी.जोशी आणि सखाराम तामसेकर विशेष प्रयत्नशील असल्याचे वृत्त आहे. वास्तविक या क्षेत्रीय अभियंत्यांनी भुजबळ यांना वाचविण्यासाठी तयार केलेला अहवाल हा बनावट दस्त तयार करण्यासारखा गंभीर गुन्हा आहे. शासनाच्या सेवेत राहून शासन विरोधी कृत्य म्हणून शासन द्रोह आहे. तरी देखील सचिव पातळीवरून त्यांच्यावर कारवाईची शिफारस होण्याऐवजी त्यांना अभय देण्याची धडपड केली जात आहे. यावर उलट सुलट चर्चेला उधाण आले असून विद्यमान साबां सचिवांचे पुर्व हितसंबंध या कारवाईच्या आड येत असल्याचेही बोलले जात आहे.
पुर्वहितसंबंध जपण्यासाठी...
चंद्रकांत जोशी, सखाराम तामसेकर हे दोन्ही विद्यमान साबां सचिव यांची हयात साबांत गेली. यापूर्वी क्षेत्रीय अभियंता म्हणून काम करतांना त्यांचेही अन्य क्षेत्रीय अभियंत्यांप्रमाणे भुजबळ लॉबीशी घनिष्ठ संबंध होते. त्याच हितसंबंधांची जाण ठेऊन क्लीन चिट अहवाल प्रकरणातील दोषी क्षेत्रीय अभियंत्यांना अभय दिले जात असल्याची चर्चा सुरू आहे.