Breaking News

खा.जाधव यांनी घेतला महावितरणच्या कामाचा आढावा

बुलडाणा, दि. 29 - जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्याकरिता महावितरणच्यावतीने विद्युत भवनच्या प्रांगणात आज 27 मे 2016 रोजी जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, अधिक्षक अभियंता गुलाबराव कडाळे,  सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, मेहकरचे आमदार संजय रायमूलकर, जि. प सदस्य भोजराज पाटील, जालींधर बुधवत आदी उपस्थित होते. 

महावितरणने कामांचे कंत्राट दिलेल्या कंत्राटदारांकडून विहीत कालमर्यादेत कामे करून घेण्याच्या सूचना करीत खासदार प्रतापराव जाधव म्हणाले, लवकरच पावसाळा सुरू होणार असून मान्सूनपूर्व पाऊसही जिल्ह्याच्या काही भागात बरसत आहे. वादळामुळे  जिल्ह्यात विद्युत खांब उखडणे, तारा पडणे, रोहीत्र बंद पडण्याचे प्रकार घडत आहे. अशा परिस्थितीत महावितरणने त्वरित कारवाई करून जनतेला न्याय द्यावा. त्याचप्रमाणे पेड पेडींग वीज जोडण्या प्रलंबित असतील, तर प्राधान्याने पूर्ण कराव्या. कंत्राटदारांना कामे देताना त्यांचा परवाना, काम पूर्ण करण्याची हमी घ्यावी. शेतकर्‍यांना  आपल्या खर्चाने विद्युत खांब नेत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. संबंधीत कंत्राटदाराने सदर साहित्य शेतापर्यंत पोहोचवावे. पोहोचविले नसल्यास शेतकर्‍यांना वाहतूक खर्च द्यावा, असेही यावेळी ते म्हणाले.
अधिक्षक अभियंता श्री. कडाळे यावेळी म्हणाले, जिल्ह्यात एप्रिल 2016 अखेर एकूण 173 अकृषक वीज वाहिन्या असून त्यापैकी 160 वाहिन्यांचा भारनियमनाच्या  अ ते ड गटात समावेश होतो. स्वतंत्र कृषि वाहिन्या 175 आहेत. एप्रिल 2016 अखेर जिल्ह्यात 1 लक्ष 45 हजार 183 कृषि वीज जोडण्या देण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी 2016-17 मध्ये 431 जोडण्या देण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात इन्फ्रा 2 योजनेतंर्गत 33/11 के. व्ही क्षमतेचे 12 उपकेंद्र होणार आहेत. त्यापैकी 8 उपकेंद्राचे काम पूर्ण झाले आहे.  
जनता दरबारात आमदार महोदयांनी विविध समस्या मांडल्या. तसेच उपस्थित शेतकरी, नागरिक यांनी आपआपली गार्‍हाणी अधिकार्‍यांसमोर मांडली. याप्रसंगी कार्यकारी अभियंता श्री. सोनकुसरे, श्री. पवार, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता आदींसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.