Breaking News

जिल्हा परिषदेतील मानापमान नाट्य...

सि.ई.ओ.यांनी सभापतींना दिलेल्या गाड्या अध्यक्षांनी बोलविल्या परत

बुलडाणा, दि. 29 - जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिपा मुधोळ यांनी जिल्ह्यातील 7 पंचायत समिती सभापती व उपसभापतीला दिलेल्या नवीन बोलेरो गाड्या, जि.प. अध्यक्षांच्या हस्ते वाटप झाल्या नाही म्हणून सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिका-यांमार्फत तोंडी आदेशाने अध्यक्षांनी त्या गाड्या वापस बोलावून घेतल्या असून दुष्काळाच्या परिस्थितीत या सातही गाड्या जि.प.मध्ये धुळखात पडून असल्याचा आरोप मेहकर पं.स.सभापती सागर पाटील यांनी केला आहे.
जि.प.च्या कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी दिपा मुधोळ यांनी 28 एप्रिलच्या आदेशानुसार चिखली, मेहकर, बुलडाणा, खामगाव, देऊळगावराजा, मलकापूर, नांदुरा या सात पंचायत समिती सभापतींना पंचायत समिती कार्यक्षेत्रात शासकीय कामानिमित्त फिरण्यासाठी बोलेरो नवीन गाड्या खरेदी करुन 30 एप्रिल रोजी त्यांना या गाड्या वाटप करण्यात आल्या. परंतु केवळ जि.प. अध्यक्षांच्या हस्ते या गाड्या वाटप झाल्या नाही म्हणून 10 मे रोजी जि.प.अध्यक्षांनी जि.प.च्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांच्यामार्फत तोंडी आदेश देवून या सातही ठिकाणच्या गाड्या परत बोलवून घेतल्या व त्या आता ऐन दुष्काळी परिस्थितीत गेल्या 15 दिवसांपासून जि.प.मध्ये धूळखात पडून आहे. याबद्दल तीव्र भावना सदरहू सभापती तथा उपसभापती व्यक्त करत आहे.
या गाड्या लवकर वाटप न झाल्यास त्याची तक्रार वरिष्ठांकडे करणार असल्याची माहिती एका पत्रकातून मेहकर पं.स.चे सभापती सागर पाटील यांनी देवून त्यांनी जि.प.अध्यक्षांच्या या हेकेखोरपणाचा शेवटी निषेध व्यक्त केला आहे.