Breaking News

सांस्कृतिक लढाईच्या आडून सुविधांवर आक्रमण

। डॉ.आ.ह.साळुंके यांचे प्रतिपादन  

अहमदनगर, दि. 29 - सांस्कृतिक लढाईच्या आडून आजच्या परस्थितीत शोषितांच्या भौतिक सुविधाही हिरावून घेतल्या जात आहेत. त्यामुळे हा संघर्ष समजावून घेत शोषितांनी संघटित होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ.ह. साळुंखे यांनी येथे केले.
ज्येष्ठ लेखक व विचारवंत दत्ता देसाई यांना कॉ.गोविंद पानसरे प्रबोधिनी पुरस्कार डॉ.साळुंखे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, अरुण कडू यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
साळुंखे म्हणाले की, या पुरस्कारामुळे कॉ.पानसरे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचे काम घडत आहे. त्यांच्या नावाचा पुरस्कार निमित्त आहे त्यांचा विचार चिरंतन राहावा व तो नव्या पिढीपर्यंत पोहोचावा हा खरा उद्देश आहे. पानसरे राज्यकर्त्यांविरुद्ध लढत होते तरी दुबळ्यांसाठी त्यांचे काळीज तडफडत होते. पानसरेंसारखे लोक नेहमी लढत असतात. चाकोरीबद्ध विचारांच्या पलीकडे जाऊन समतेचा विचार पानसरे यांनी समाजासमोर मांडला असे सांगून ते म्हणाले की, धार्मिक तणाव-जातीय तेढ संघर्षाने सुटणार नाही त्यासाठी संवादाचा मार्ग उत्तम आहे. शोषितांच्या चळवळी प्राचीन काळापासून सुरु आहेत. चळवळीच्या ध्येयपूर्तीसाठी मात्र, आजही कॉ. पानसरेंसारख्या समाजसेवकांना प्राण गमवावा लागत आहे. ज्यांना प्रस्थापित समाज व्यवस्था टिकवायची ते त्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसतात. परंतु,जे शोषितांच्या चळवळी चालवत आहेत तेही चळवळी पुढच्या पिढीपर्यंत नेण्यास कमी पडले ही मोठी उणीव सांस्कृतिक संघर्षात राहून गेली,अशी खंत त्यांनी व्यक्त केली.