Breaking News

सेकंडहँड फोन विक्रीस- अ‍ॅपलला सरकारचा नकार

दिल्ली, दि. 01 - अ‍ॅपलने त्यांचे सेकंडहँड फोन भारतात विक्री करण्यासाठी सरकारकडे मागितलेल्या परवानगीला नकार देऊन केंद्र सरकारने अ‍ॅपल इंकला मोठा झटका दिला आहे. वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने हे फोन भारतात आयात करण्यास अ‍ॅपलला परवानगी नाकारली आहे परिणामी भारतात रीटेल स्टोअर्स उघडण्याचा अ‍ॅपलचा प्लॅनही बारगळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिकेसह अन्य देशात अ‍ॅपल सेकंड हँड फोन विक्री करत आहे.
या फोन्सच्या किंमती कमी असतात. हे फोन युजरने परत केलेले अथवा डॅमेज स्थितीत कंपनीने परत घेतलेले असतात. या फोनचे बॉडी कव्हर बदलून व त्यात आवश्यक त्या दुरूस्त्या करून हे फोन परत विकले जातात. मात्र अशा फोनमुळे ई कचरा वाढण्याची शक्यता मोठी असते कारण या फोनचे रिसायकलींग करणे सोपे नाही. याच कारणास्तव अशा फोनच्या आयातीस व विक्रीस अ‍ॅपलला मंजूरी दिली गेली नाही असे समजते.
अ‍ॅपलचे सीईओ टीम कुक यांची भारतीय बाजारपेठेवर नजर असून त्यासंदर्भात ते नुकतेच भारत दौर्यावरही आले होते. अ‍ॅपलची गेल्या दहा वर्षात यंदा प्रथमच विक्री घसरली आहे व ती वाढविण्यासाठी अ‍ॅपल प्रयत्नशील आहे. त्यासाठीच सेकंड हँड फोन आयात व विक्रीची भारतात परवानगी मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात होते.