Breaking News

हनबरवाडी-धनगरवाडी उपसासिंचन योजनेचा प्रस्ताव द्या : विद्या ठाकूर

सातारा, दि. 30 (प्रतिनिधी) : कराड तालुक्यातील टंचाईग्रस्त गावातील कायमस्वरुपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी हनबरवाडी-धनगरवाडी उपसासिंचन योजनेचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा, अशा सूचना महिला व बाल विकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी दिल्या. कराड येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस प्रांताधिकारी किशोर पवार, तहसीलदार राजेंद्र शेळके, गटविकास अधिकारी अविनाश फडत
रे, विक्रम पावसकर तसेच शेतकरी उपस्थित होते.
दुष्काळी भागातील जनतेला विविध उपाययोजनांच्या माध्यमातून दिलासा देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगून ना ठाकूर म्हणाल्या, गतवर्षी कमी पाऊस पडल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. यावर मात करण्यासाठी राज्यभर जलयुक्तशिवार अभियानाच्या माध्यमातून काम चालू आहे. यावर्षी चांगला पाऊस होईल, असे हवामान विभागाने संकेत दिले आहेत. जलयुक्त शिवार अभियानात झालेल्या कामांचे चांगले परिणाम होणार्‍या पावसामुळे निश्‍चित दिसून येतील.
तालुक्यातील टंचाई जाहीर केलेल्या गावांमधील जलयुक्त शिवार अभियानातील कामे, पाझर तलावांची दुरुस्ती, विंधन विहिरींची दुरुस्ती तात्काळ करा, अशा सूचना करुन ठाकूर म्हणाल्या, टंचाईची परिस्थिती लक्षात घेवून अधिकर्‍यांनी जेथे टँकरची मागणी आहे, तेथे टँकर देण्याची व्यवस्था करावी. त्यासाठी आवश्यक असलेल्या निधीसंदर्भात आराखडा सादर करा. तसेच टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी तात्काळ टंचाईग्रस्त भागासाठी सोडावे, अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या.