Breaking News

ब्राझीलमध्ये 16 वर्षांच्या मुलीवर 33 जणांचा सामूहिक बलात्कार

साओ पावलो, दि. 29 - ब्राझीलमध्ये रिओ ऑलिम्पिकची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असतानाच एक धक्कादायक घटना घडली आहे. तब्बल 30 हून अधिक  जणांनी एका 16 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला असल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. हजारो खेळाडू रिओ ऑलिम्पिकसाठी दाखल  होणार असतानाच या घटनेमुळे त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
रात्रीच्या सुमारास बॉयफ्रेंडसोबत राहण्यासाठी पीडित अल्पवयीन मुलगी गेली असताना पहाटे या घटनेने ती पुरती हादरून गेली. पहाटेच्या सुमारास बंदुकधारी  आणि रायफल बाळगणा-या 33 जणांनी पीडित मुलीला घेरले आणि तिच्याकडे जोर जबरदस्तीने शरीर सुखाची मागणी करून तिच्यावर सामूहिक बलात्कार  केला. या मुलीवर 36 तासांहून अधिक काळ सतत बलात्कार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.  त्यानंतर पुढील उपचारासाठी मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
नग्नावस्थेत पीडित मुलगी आढळून आली असून, ती नशेत असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. तिच्या शरीरावर अश्‍लील भाषेत काही लिहिले असून,  अनेकांनी तिचे न्यूड फोटो आणि व्हिडीओ काढले आहेत. ते फोटो काढून सोशल मीडियावरही टाकल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. या घटनेने  पीडित मुलीला जबर धक्का बसल्याची माहिती तिच्या वडिलांनी दिली आहे. या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये तिच्या  बॉयफ्रेंडचाही समावेश आहे. सोशल मीडियावर तिचे न्यूड फोटो व्हायरल केल्याप्रकरणी एका मुलालाही अटक करण्यात आली आहे.