Breaking News

पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल : पंतप्रधान

स्वच्छ पाणी म्हणजे उत्तम आरोग्य व आर्थिक विकास

नवी दिल्ली, दि. 25 -  पुरेसा पाऊस न झाल्यामुळे देशातील अनेक राज्यांना भीषण दुष्काळी संकटाचा सामना करत लागत आहे, त्यापार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी रविवारी ‘मन की बात’  कार्यक्रमामधून देशवासियांशी संवाद साधताना दुष्काळ आणि शिक्षण या विषयांवर भाष्य केले. पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल असून त्याला वाचवा असे आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केले. 
पावसाचे पाणी वाचवून सुद्धा दुष्काळाच्या संकटावर मात करता येऊ शकते, यासाठी गावा-गावांमध्ये सर्वांनी आपल्या घरांच्या खाली टाक्या तयार करायला हव्यात. यामुळे पडणारे पाणी या टाक्यांत साठवले जाऊन पाण्याची बचत होईल. पाण्याचे संवर्धन आणि साठवण करणे आवश्यक असून, आपण यासाठी अभियान सुरु केले पाहिजे. पाण्याची पातळी वाढल्यानंतर पाण्याचा दर्जाही सुधारेल आणि स्वच्छ पाणी म्हणजे उत्तम आरोग्य आणि आर्थिक विकास असल्याचे मोदींनी सांगितले.
आपल्या भाषणात मोदींनी महाराष्ट्रातील अहमदनगरमधील गावाचा उल्लेख देखील यावेळी केला. या गावातील लोकांनी पिकांचे पॅटर्न बदलले, कमी पाणी घेणार्‍या पिकांची शेती  या गावातील लोकांनी सुरु केली असे त्यांनी सांगितले.  पंतप्रधानांनी आपल्या 19 व्या ‘मन की बात’ कार्यक्रमात कुटुंबीयांनी आपल्या मुलांशी त्यांच्या शाळेत होणाऱया उपक्रमांविषयी देखील चर्चा करायला हवी, असे आवाहन देखील केले. यावर्षी चांगला पाऊस होणार ही आनंदाची बातमी आहे पण त्याबरोबर आव्हानही आहे. जास्तीत जास्त पिकांचे उत्पादन कसे घ्यायचे याचा आपण विचार केला पाहिजे. मन की बात मध्ये त्यांनी गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी सरकारकडून सुरु असलेल्या प्रयत्नांची ही माहिती दिली. तसेच सरकारच्या अनेक योजना यशस्वी होत असल्याचे ते म्हणाले. देशातील जनतेने उस्फूर्तपणे गॅस सबसिडी सोडल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले आहेत. आतापर्यंत 1 कोटी लोकांनी गॅस सबसिडी सोडल्याचे त्यांनी म्हटले.