Breaking News

‘राष्टवाद’ शब्दामागे संघाचा छुपा अजेंडा ! : कन्हैया

कन्हैय्या कुमारला ऐकण्यासाठी बालगंधर्वला तुफान गर्दी 

पुणे, दि. 25 - आप सबको मेरा जय भीम! अशी सुरूवात करत कन्हैय्याकुमारने मोदीजी, ‘मन की बात’ कराच, पण कधीतरी मराठवाड्यातील शेतकर्‍याबद्दलही बोला, सरकारमध्ये आहात, तर जनतेला रोजगार द्यावाच लागेल. केवळ जाहिरातबाजीवर खर्च करुन योजना यशस्वी होत नाहीत, ‘राष्ट्रवाद’ शब्दामागे राष्ट्रीय स्वंयसेवक संघ, ब्राह्मणवादाचा छुपा अजेंडा असल्याची टीका रविवारी कन्हैया कुमार याने मोदी आणि संघावर केली. तो पुण्यातील बालगंधर्व सभागृहातील सभेत बोलत होता. भारत माताचे स्वरूप बदलत चालले आहे, भारत माता की जय ची ठेकेदारी चालणार नाही असे खडे बोलही त्याने सुनावले. 

मोदी सरकार विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या बंद करत आहेत आणि स्वत: सूट शिवत आहेत, अशी टीका करत ‘आम्ही आमचे विचार सांगितल्यावर त्यांना भीती का वाटते? मी वाट पाहतोय, की ज्यांचा बुद्धिभेद झाला आहे, ते लवकरच मार्गावर येतील. रोहित कधी मरणार नाही, मी मुळीच घाबरणार नाही, आमची लढाई सुरूच राहिल असे कन्हैय्या कुमार याने यावेळी सांगितले. आमच्या पिढीला आता कळले आहे, की शोषणाचा विरोध होण्याची गरज आहे, त्यामुळेच आम्ही शोषणमुक्तीच्या विरोधात लढाई सुरू केली आहे. महाराष्ट्राच्या भूमीला आज जातीयवाद आणि हिंसेचे प्रयोगशाळा करण्यात आली आहे, पण लक्षात ठेवा सत्य नक्कीच जिंकेल.तुम्ही आम्हाला जेवढे दाबण्याचा प्रयत्न कराल, आम्ही तेवढेच उसळून वर येऊ, असा इषारा कन्हैय्याकुमारने यावेळी दिला.
शिक्षणावर भाष्य करतांना कन्हैय्या कुमार म्हणाला की, इंजिनियरिंग आणि एमबीए करून आज डिटर्जंट‘ विकण्याची मॅनेजमेंट तरुण करत आहेत, हे या देशाचे दुर्भाग्य आहे. मोदी सरकारने शिक्षणावर 17 टक्के बजेट कपात करून नेमके काय साधले असा सवाल ही त्याने यावेळी उपस्थित केला. ज्यांनी शिक्षण, पोलीस अशा सर्व क्षेत्रांचे ठेकेदारीकरण केले, आता फक्त संसदच तेवढी बाकी राहिली आहे, तिचेही ठेकेदारीकरणं करूया असा उपरोधिक सवाल त्याने यावेळी केला.
कन्हैया कुमारने भाजपासह संघालाही सुनावले. मातेची अडचण नाही पण कधी रोहित वेमुलांच्या आईला भेटा, त्या आईची वेदना काय असेल जिच्या मुलावर चप्पल भिरकावली जाते, मुलीवर बलात्कार होत आहेत. तुमची संवेदना नष्ट झाली का? असा सवालही त्यांने उपस्थित केला. नव्या पिढीने यागोष्टी समजून घ्या, योगाला आमचा विरोध नाही पण काय घ्यायचे आणि काय सोडायचे हे पहा असे म्हणत योगगुरु रामदेव बाबावर ही कडकडून टीका केली. देशातील व्यवस्था आणि परंपरा मिठवायची असेल तर पुण्याची पारंपरिक पगडीतील पिवळी पट्टी निळी करा, असे आवाहन कन्हैय्या कुमारनी केले. अत्यंत कडक पोलीस बंदोबस्त कार्यक्रमस्थळी ठेवण्यात आला आहे. 40-50 गाड्यांच्या ताफ्यासह तो मुंबईहून पुण्यात दाखल झाला आहे. बालगंधर्व रंगमंदिर परिसरात तुफान गर्दी असून,  पास असलेल्या व्यक्तींनाच सभेला प्रवेश देण्यात आला. परिसराला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप प्रप्त झालं होतं. बालगंधर्व रंगमंदिरातील कन्हैया कुमारच्या कार्यक्रमाला अमोल पालेकर, संध्या गोखले, बाबा आढाव, सिद्धार्थ धेंडे, मुक्ता मनोहर ,किरण मोघे संदीप बर्वे उपस्थित होते. पासशिवाय प्रवेश मिळत नसल्यामुळे बालगंधर्व च्या गेटवर तरूणांची घोषणाबाजी केली.