Breaking News

रेल्वे सुरक्षिततेचा प्रश्‍न !

अलीकडे रेल्वे प्रवास सुरक्षित राहीला नसल्याची भावना प्रवाशांमध्ये जोम पकडू लागली आहे. प्रवासादरम्यान विविध ठिकाणी अडविली जाणे. रेल्वेच्या संदर्भात अनेक घटना अशा घडत आहेत की ज्यात प्रवाशांची सुरक्षितता दावणीला लागली आहे. गेल्या दोन महिन्यांच्या काळात दोन भिषण आगींचा सामना रेल्वेला करावा लागला आहे. यात अनेक प्रवाशांचे बळी गेले आहेत. घटना होवून गेल्यानंतर मृत वा जखमिंना नुकसान भरपाई जाहिर करणे एवढाचा कार्यक्रम जर प्रशासन घेत असेल, तर एकंदरीत सुरक्षिततेचे काय? असा प्रश्‍न सहज पडतो. रेल्वे ही देशाचे एक टोक दुसर्‍या टोकाला जोडणारे दळण-वळणाचे साधन आहे. दोन टोकांना जोडणार्‍या रेल्वेमुळे अनेक राज्यांचे प्रवासी एकाच बोगीतून प्रवास करतात. परंतु अलीकडे राजकीय क्षेत्रात होणार्‍या भाषावादाचे पर्यावसन रेल्वेच्या हिंसाचारात दिसून येत आहेत. भारतीय रेल्वे ही जगातल्या मोठ्या संस्थांपैकी एक आहे. या संस्थेचा कारभार अजस्त्र आहे. त्यामुळेच देशाच्या मुख्य अर्थसंकल्पाबरोबरच रेल्वेच्या अर्थ संकल्पाला स्वतंत्र स्थान आहे. त्यामुळे रेल्वेच्या उत्पन्न आणि खर्चाचा आवाका प्रचंड मोठा आहे. त्यात प्रवाशांना सुविधा देण्यासाठी हात काहीसा आखडता घेतला जातो. अर्थात जेव्हा सुविधा पुरविल्या जातात त्या सुविधांचा वापर जनतेनेही काळजीपूर्वक करायला हवा. रेल्वे प्रशासन, रेल्वेचा कारभार हा आता काही अंशी खासगी क्षेत्राकडे वळविणार आहे. पीपीच्या माध्यमातून खासगी क्षेत्राचे रेल्वेत मोठ्या प्रमाणात येण्याचे मनसुबे आहेत. यासाठी अर्थसंकल्पामध्येही तरतूद झाली आहे. मात्र या कामाला गती देण्यासाठी काही खासगी उद्योजक टपून बसले आहेत काय? रेल्वे सुरक्षिततेचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला तर खासगी क्षेत्राला आधिक आणि लवकर वाव मिळेल, अशी शक्यताही तपास यंत्रणेने तपासून पाहिली पाहीजे. बर्‍याच राज्यांमध्ये राज्य परिवहन मंडळे ही खासगी क्षेत्राकडे सोपविली जाण्याचे सोपस्कार केले जात आहेत. असा प्रकार रेल्वेतही व्हावा अशी काहींची इच्छा आहे काय, त्यामुळे त्या दिशेने योग्य ती कारवाई झाली पाहीजे. रेल्वेचे शहरांतर्गत प्रवासाचे मोठे साधन म्हणजे मुंबईतील लोकल रेल्वे आहे. मुंबईचे आर्थिक जीवन पूर्णत: या रेल्वे जाळ्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे मुंबई सारख्या प्रदेशात तर रेल्वेची सुरक्षा अधिक काटेकोरपणे होणे गरजेचे आहे. डेहराडून एक्सप्रेसचा अपघात नेमका मुंबई लगतच झाल्यामुळे येथील रेल्वे सेवांवर त्याचा थेट परिणाम झाला. दोन दिवसांपूर्वी ठाण्यातीलच रुळावर उभ्या असलेल्या लोकलला आग लागली होती. या आगीची कारणे अद्यापही कळू शकलेली नाहीत. कारण कळले नाही तर उपाय योजना करता येत नाही. त्या अर्थाने पाहिल्यास अशा प्रकारची घटना चालत्या लोकलवर जर घडली तर हाह:काराची परिस्थिती निर्माण होवू शकते याचे भान रेल्वे प्रशासनाने राखले पाहिजे. त्यामुळे रेल्वेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले गेले पाहिजे.