Breaking News

मालेगाव बॉम्बस्फोटातील 9 आरोपींची निर्दोष मुक्तता

राष्ट्रीय तपास संस्था आणि सीबीआयची नाचक्की  

मुंबई, दि. 26 - मालेगाव येथे 2006 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील 9 मुस्लिम आरोपींची सोमवारी न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने हा निर्णय देत 9 आरोपींची निर्दोष सुटका केली, मात्र त्यापैकी 1 आरोपी आता जिवंत नसल्याने 8 मुस्लिम आरोपींची सुटका झाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे एटीएस व सीबीआयला मोठा झटका बसला आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी हा निकाल दिला.
मालेगाव बॉम्बस्फोटातील नऊ मुस्लिम आरोपींबद्दल आपल्याकडे सबळ पुरावे नसल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दोन वर्षांपूर्वी मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयाला सांगितले होते. मात्र काही दिवसांपूर्वी एनआयएने आपल्या आधीच्या भूमिकेवरून घुमजाव करत या नऊ मुस्लिमांच्या सुटकेला विरोध दर्शवला होता. त्यानंतर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश काय निर्णय देतात, याकडे लक्ष लागले होते. अखेर सर्व नऊ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
या नऊ मुस्लिम आरोपींमध्ये नूरूल हुडा, शब्बीर अहमद, रईस अहमद, सलमान फार्सी, फरोघ मगदुमी, शेख मोहम्मद अली, असीफ खान, मोहम्मद झाहीद आणि अब्रार अहमद यांचा समावेश आहे. या सर्वांना 2006 मध्ये बॉम्बस्फोटाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. नोव्हेंबर 2011 मध्ये त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. यापैकी दोघांना मुंबईतील 2006 मधील 7/11 बॉम्बस्फोटांप्रकरणी दोषी ठरविण्यात आल्याने त्यांची पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. शब्बीर अहमद याचा गेल्यावर्षी अपघातात मृत्यू झाला होता. मालेगावच्या या बॉम्बस्फोटात 37 लोकांचा मृत्यू झाला होता.
ज्या एटीएस आणि एनआयएच्या अधिकार्‍यांनी याप्रकरणाची चौकशी केली आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केली.