विजय मल्ल्याचा पासपोर्ट रद्द
ईडी अटकेसाठी करणार इंटरपोलला संर्पक
नवी दिल्ली, दि. 25 - भारतीय बँकांचे 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याचा आरोप असलेल्या विजय मल्ल्याचे पासपोर्ट अखेर परराष्ट्र मंत्रालयाने रद्द केले आहे. विजय मल्ल्याने जी उत्तरे दिली त्यावर विचारविनिमय करुन पासपोर्ट कायदा कलम 10(3) अंतर्गत मल्ल्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त विकास स्वरुप यांनी ट्विटरवरुन दिली. त्यापूर्वी मल्ल्या राज्यसभेचे खासदार असल्याने त्यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट 4 आठवड्यांसाठी सस्पेंड करण्यात आला होता. दरम्यान, मल्ल्यांना अटक करण्यासाठी ईडी आता लवकरच इंटरपोलला संपर्क करणार असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. ईडीने विजय मल्ल्यांना तीन समन्स पाठवले आहेत. पण मल्ल्या एकदाही हजर झाले नाही.मागच्या महिन्याभरापासून ब्रिटनमध्ये असलेल्या मल्ल्यावर विविध बँकांचे नऊ हजार कोटींचे कर्ज थकवल्या प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरु आहे.मल्ल्याला भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे शुक्रवारी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले होते. मल्ल्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंटही बजावण्यात आले आहे.
