तलाठ्यासह लेखनिक लाच प्रकरणी गजाआड
केज, 18 - जमिनीचा फेरफार करण्यासाठी लेखनिकामार्फत शेतकर्याकडून 2200 रूपयांची लाच स्वीकारणार्या तलाठ्याला व लेखनिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने येथे गुरूवारी दुपारी रंगेहाथ पकडले. केज ठाण्यात गुन्हा नोंद करून दोघांनाही अटक करण्यात आली.
अनिल लक्ष्मण कुलकर्णी असे त्या तलाठ्याचे नाव असून, तो गावातीलच तुळशीराम जगन्नाथ मुकादम या खासगी लेखनिकाकडून पैसे घेताना पकडला. माळेगाव सज्जांतर्गत सुकळी येथील शेतकर्याला तीन एक्कर जमीन आहे. वारसा हक्काप्रमाणे त्यांना आपले नाव फेरफारला लावायचे होते. त्यासाठी त्यांनी तलाठी कार्यालयात रितसर अर्ज केला. तेव्हा तलाठी कुलकर्णी याने शेतकर्याकडे 2200 रूपयांची लाच मागितली. दरम्यानच्या काळात शेतकर्याने बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.