भारताबद्दल आपल्या हृदयात महत्त्वाचे स्थान : बान की मून
न्यूयॉर्क, 04 - भारताबद्दल आपल्या हृदयात महत्त्वाचे स्थान आहे, असे संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांनी म्हटले आहे. म्हणूनच आपण राजकीय कारकीर्दीची सुरुवात भारतातून केली. हा निर्णय माझ्या दृष्टीने धाडसी आणि महत्त्वाचा होता.
‘व्हॉट आय गेन्ड फ्रॉम चूझिंग द रॉकी रोड’ अर्थात खडकाळ मार्ग निवडून मला काय मिळाले, अशा आशयाचा लेख मून यांनी लिहिला आहे. नवी दिल्लीत मुत्सद्दी म्हणून कारकीर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी लेखात सुरुवातीच्या दिवसांचे स्मरण केले. ती महत्त्वाची आणि रोमांचक नेमणूक होती. दक्षिण कोरियात राजकीय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर परदेशातील दूतावासात नियुक्तीची संधी मिळाली. त्यानुसार दिल्लीत नेमणूक झाली. दिल्लीत जाण्यासाठी ते उत्सुक होते. दिल्लीतील छोट्या दक्षिण कोरियाच्या दूतावासातील कामकाजादरम्यान अनेक चांगल्या संधी मिळाल्या.
या संधींमुळे मला माझ्यातील प्रतिभेला अधिक वाव देता आला. अन्य मोठ्या ठिकाणांपेक्षा दिल्लीत अतिशय आरामदायक स्थिती होती. त्या ठिकाणी मला धोरणात्मक प्रकरणांत अधिक काम करायला मिळाले. या काळात अधिकार्यांच्या भेटी घेणे, आपल्या देशाचे हितसंवर्धन करणे, धोरणात्मक प्रकरणांत मसुदा तयार करणे इत्यादी कामे शिकण्याची संधीही मिळाली. त्यातून मला नवीन दिशा व आव्हानांचा मुकाबला करणे भाग पडले. त्यातून खूप काही शिकायला मिळाले. अन्यथा मला काहीही शिकता आले नसते. म्हणूनच भारतासह संपूर्ण दक्षिण आशियाला माझ्या मनात एक महत्त्वाचे स्थान आहे.