Breaking News

पंधरा लाखांच्या खंडणीसाठी सात वर्षांच्या मुलाची हत्या

कल्याण, 04 - पंधरा लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या कल्याणमधील एका व्यापार्‍याच्या सात वर्षांच्या नयन संतोष जैनची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी राजेंद्र मोरे, विजय दुबे आणि देशराज कुशवाह या तिघांना अटक केली. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी गांधी चौकातील दुकाने बंद ठेवण्यात आली. 
गांधी चौकातील गजानन टॉवरमध्ये नयन राहत होता. तो कल्याणनजीकच्या सेक्रेड हार्ट स्कूलमध्ये इयत्ता दुसरीत शिकत होता. त्याचे बुधवारी दुपारी अपहरण झाले होते. तो दुपारी 4च्या सुमारास सोसायटीच्या खाली शाळेच्या बसमधून उतरला. हे आईने घरातून पाहिले. मात्र, त्याच वेळी त्याला त्याच्या वडिलांच्या नयन किड्स या कपड्याच्या दुकानात पूर्वी काम करणारेदोन कामगार भेटले. त्यांनी नयनला त्यांच्यासोबत मोटारसायकलवरून फिरायला चलण्यास सांगितले. दोघेही ओळखीचे असल्याने तो त्यांच्यासोबत गेला. त्यानंतर, अवघ्या काही मिनिटांत नयनचे वडील संतोष यांना खंडणीसाठी फोन आला. 15 लाख रुपये न दिल्यास नयनला मारण्याची त्यांनी धमकी दिली. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी वेगवेगळी पथके स्थापन करून तपास सुरू केला. आरोपींचे फोन ट्रेस केले असता ते वांगणी, मुरबाड परिसरात असल्याचे आढळत होते. त्याआधारे पोलिसांनी रात्रभर त्यांचा शोध घेतला.
गुरुवारी सकाळी आरोपींनी संतोष जैन यांना टिटवाळा ते आंबिवलीदरम्यान ट्रेनमधून पैशांची बॅग फेकण्यास सांगितले. पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवून पाठलाग केला. पैसे घेऊन पळणार्‍या राजेंद्र मोरे आणि विजय दुबे यांना पकडले. त्यांनी नयन जिवंत असून तो मुरबाड येथे तिसरा साथीदार कुशवाह याच्या ताब्यात असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यालाही अटक केली. तेव्हा त्याने नयनला जवळच्या जंगलात लपवल्याचे सांगितले. मुरबाड तालुक्यातील शिवळे गावातील खाटेघर नदीच्या पुलाखाली नयनचा मृतदेह आढळला. कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. नयनची बुधवारी रात्रीच गळा आवळून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.