मराठमोळा सिंघम आयपीएस शिवदीप लांडे महाराष्ट्रात परतणार!
मुंबई, 05 - बिहार पोलीस दलात कार्यरत असलेला मराठमोळा सिंघम, पाटणा इथं डॅशिंग काम करून, एसपी शिवदीप लांडे आख्ख्या बिहारच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. मात्र शिवदीप लांडे यांना महाराष्ट्रात परतायचे आहे. महाराष्ट्रात बदली मिळावी म्हणून लांडे यांनी अर्जही केला आहे.
या अर्जाची मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत, गृहविभागाला अर्जाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. आयपीएस शिवदीप लांडे यांनी या अर्जाबाबत बोलण्यास नकार दिला आहे. मात्र त्यांचे सासरे आणि महाराष्ट्रातील जलसंपद्दा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
शिवदीप लांडे यांनी बिहारच्या गुन्हेगारी विश्वात दहशत बसवली आहे. अशा अधिकार्याची महाराष्ट्राला गरज आहे. शिवदीपने महाराष्ट्रात गुन्हे अन्वेषण किंवा दहशतवादविरोधी पथकात काम करावं अशी आमची इच्छा आहे असे शिवतारे म्हणाले. शिवदीप लांडे यांनी यापूर्वी बिहारमधील अरारिया, पूर्णिया आणि जमलपूरमध्येही पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कामाचा अनुभव आहे. त्यामुळे बदलीसाठी शिवदीप पात्र आहेत, असं शिवतारे यांचा दावा आहे. याशिवाय सर्व केंद्र सरकारी सेवांमधील अधिकार्यांना आपल्या राज्यात परतण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाचीही परवानगी असते, असेही शिवतारे म्हणाले.