Breaking News

गणेश पांडे प्रकरण राज्य महिला आयोगाकडे


मुंबई,प्रतिनिधी,दि. 30-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी गणेश पांडे प्रकरणाची चौकशी राज्य महिला आयोगाकडे सोपविल्याची माहिती विधान परिषदेत निवेदनाद्वारे बुधवारी दिली. दरम्यान, भाजपनेही या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन महिला आमदारांची चौकशी समिती जाहीर केली आहे.पक्षाच्या एका महिला कार्यकर्तीशी भाजपच्या युवा मोर्चाचा तत्कालीन मुंबई अध्यक्ष गणेश पांडे याने असभ्य वर्तन केल्याचे प्रकरण पुढे आले होते. ही घटना भाजयुमोच्या मथुरेतील
राष्ट्रीय अधिवेशनाच्या वेळी घडली होती. गेल्या दोन दिवसांपासून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले. विधान परिषदेत विरोधी पक्षाच्या महिला सदस्यांनी याविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. या वेळी झालेल्या चर्चेदरम्यान सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी हे प्रकरण मुंबईतील ज्येष्ठ महिला आयपीएस अधिकार्‍यांकडे
सोपवून पीडित मुलीची इनकॅमेरा‘ जबानी नोंदवता येईल का याचा सरकारने निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले होते.