ब्राह्मणगाव रस्त्याच्या वादातून बाप-लेकांचा खून
चारठाणा, 04 - ब्राह्मणगाव (ता. जिंतूर) शिवारात पाणंद रस्त्याच्या वादातून चार जणांनी केलेल्या हल्ल्यात बापाचा जागीच, तर लेकाचा उपचारादरम्यान बुधवारी (ता. दोन) मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली होती.
जिंतूर तालुक्यातील चारठाण्यापासून आठ किलोमीटरवरील ब्राह्मणगाव येथे पाणंद रस्त्याचा वाद होता. त्या रस्त्यावरून बाजीराव मल्हारी वाव्हळे (वय 54) व त्यांचा मुलगा मिलिंद बाजीराव वाव्हळे हे जात होते. त्याच वेळी या दोघांवर पाठीमागून अचानक चार जणांनी लाठ्या-काठ्यांसह शस्त्राने गंभीर वार करणे सुरू केले. बाजीराव वाव्हळे यांना खाली पाडून कोयत्याने, दगडाने ठेचून मारले; तसेच मिलिंद याच्यावरही त्यांनी काठी व कोयत्याने हाता-तोंडावर मारहाण सुरू केली. यात बाजीराव यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर बुधवारी उपचारादरम्यान मुलगा मिलिंद याचाही मृत्यू झाला.
याप्रकरणी अनिल बाजीराव वाव्हळे यांच्या फिर्यादीवरून संशयित रामभाऊ बाजीराव वाव्हळे (वय 65), बाबासाहेब रामभाऊ वाव्हळे, समाधान महादू वाव्हळे (सर्व रा. ब्राह्मणगाव) व राहुल सूर्यवंशी (रा. हानवतखेडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुनील पुंगळे तपास करीत आहेत. दरम्यान, यातील तिघांना पोलिसांनी मंगळवारीच अटक केली होती. बाबासाहेब वाव्हळे हा फरारी होता. तो रामतीर्थ (ता. मंठा, जि. जालना) येथे नातेवाइकांकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार खंडागळे, हनुमान कच्छवे, सखाराम टेकुळे, विठ्ठल कटारे, संजय घुगे, श्याम काळे, परमेश्वर शिंदे, गणेश कौटकर यांनी तेथे जाऊन त्यास अटक केली.