आता कल्याण ते सीएसटी थेट प्रवास !
मुंबई, प्रतिनिधी, दि. 4- कल्याणहून निघणार्या गाडीत गर्दीच्या वेळी डोंबिवली येथे चढायला मिळणे मुश्कील होते.. मुंबईहून कल्याणला निघालेल्या गाडीत मुलुंडला उतरणे कठीण जाते.. या आणि अशा अनेक तक्रारी टाळण्यासाठी मध्य रेल्वे अतिजलद गाड्या चालवण्याच्या विचारात आहे.
ऐन गर्दीच्या वेळी अर्ध्या तासाच्या अंतरात एकामागोमाग एक अशा आठ अतिजलद गाड्या सोडण्याबाबत मध्य रेल्वे व्यवहार्यता चाचणी करणार आहे. कल्याण, डोंबिवली आणि ठाणे या स्थानकांवरून सुटणार्या या गाड्या थेट मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला येणार आहेत.गेल्या काही वर्षांत मध्य रेल्वेवरील अनेक जलद गाड्यांचे थांबे वाढवण्यात आले आहेत. मात्र दरवाजात लटकंती करणार्या टोळक्यांची दादागिरी, गाडीत जागा नसतानाही प्रत्येक स्थानकावर वाढणारा गर्दीचा रेटा आदी गोष्टींमुळे गाडीतून पडून होणार्या अपघातांतही वाढ झाली आहे. यावर विविध उपाययोजनांचा विचार करणार्या मध्य रेल्वेने आता अतिजलद गाड्यांबाबत विचार सुरू केला आहे.
सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी अर्ध्या तासाच्या अंतरात सात ते आठ अतिजलद गाड्या लागोपाठ सोडता येतील का, याबाबत मध्य रेल्वे चाचणी करीत असल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी स्पष्ट केले. या गाड्या कल्याण, डोंबिवली आणि ठाणे या स्थानकातून निघतील आणि थेट मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला येतील. त्यामुळे एकदा गाडीत चढल्यानंतर प्रवाशांना थेट सीएसटीला उतरता येईल. परिणामी गाडीत रेटारेटी होणार नाही, असे ब्रिगेडिअर सूद यांनी सांगितले. याबाबतची व्यवहार्यता चाचणी आणि अहवाल तयार करण्याचे काम मुख्य परिचालन व्यवस्थापकांकडे सोपवल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच या गाड्यांमुळे प्रवासाचा वेळ कमी होणार असल्याने त्या वेळेत आणखी दोन-तीन गाड्या वाढवून मधल्या स्थानकांवरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या गाड्यांना दादरला थांबा देणे आवश्यक असल्यास तसाही विचार करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रवाशांच्या फायद्याचा निर्णय
पश्चिम रेल्वेवर याआधीच अंमलबजावणी पश्चिम रेल्वेच्या 119 जलद गाड्या अंधेरी आणि बोरिवली यांदरम्यानच्या जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड आणि कांदिवली या स्थानकांवर थांबतात. पश्चिम रेल्वेने या गाड्यांपैकी काही गाड्यांना अंधेरी ते बोरिवली यांदरम्यान एकही थांबा दिला नव्हता. असा प्रयोग 9 जानेवारीपासून करण्यात आला होता. मात्र हा उपक्रम प्रवाशांपर्यंत व्यवस्थित न पोहोचल्याने प्रवाशांनी या उपक्रमाबाबत नाराजी व्यक्त केली होती. पण अंधेरी ते बोरिवली यांदरम्यान गाडी एकाही स्थानकावर न थांबल्यास 16 मिनिटे लागतात. तर गाडी प्रत्येक स्थानकावर थांबल्यास 22 मिनिटांचा प्रवास आहे. त्यामुळे प्रवाशांसाठीही हा निर्णय फायद्याचा ठरणार असल्याचे त्यांना पटवून द्यावे लागेल, असे पश्चिम रेल्वेच्या एका अधिकार्याने सांगितले.