उच्च न्यायालयाने मागवला एसटीच्या उत्पन्नाचा तपशील
मुंबई, प्रतिनिधी, दि. 4- बेकायदा प्रवासी वाहतुकीविरोधात राबवलेल्या मोहिमेमुळे एसटीच्या उत्पन्नात किती वाढ झाली, याचा तपशील उच्च न्यायालयाने मागवला आहे. दत्ता माने यांनी याबाबत जनहित याचिका दाखल केली होती. न्या. नरेश पाटील व न्या. अमजद सय्यद यांच्यासमोर याचिकेवर काल सुनावणी झाली.
एसटीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती या वेळी सरकारतर्फे न्यायालयात देण्यात आली. महत्त्वाच्या एसटी आगारांच्या शेजारी सीसीटीव्ही बसवून तेथील अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्याचे प्रयत्न होत आहेत. एसटीसाठी नव्या गाड्या घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. विविध समाजघटकांना एसटी देत असलेल्या सवलतींचा परतावाही सरकारकडून दिला जात आहे. अशा स्थितीत अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात राबवलेल्या मोहिमेमुळे एसटीच्या उत्पन्नात किती वाढ झाली, असा प्रश्न खंडपीठाने विचारून सुनावणी तहकूब केली.