Breaking News

आंध्र प्रदेशात वाळू फुकटात ; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची घोषणा

विजयवाडा, 03 - आंध्र प्रदेशात वाळू चक्क फुकटात देण्याची घोषणा मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू सरकारने घेतला आहे. चंद्राबाबूंच्या या निर्णयामुळे आंध्र प्रदेश हे फुकटात वाळू मिळणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.
चंद्राबाबू सरकारने वाळूतून मिळणार्‍या महसूलावर पाणी सोडून हा निर्णय घेतला.  
या निर्णयामुळे राज्य सरकारचा तब्बल 200 कोटी रुपयांचा महसूल बुडणार आहे. महाराष्ट्राप्रमाणेच आंध्र प्रदेशातही वाळू हा प्रश्‍न ऐरणीवर होता. त्यावर तोडगा काढण्यासाठी कॅबिनेट बैठकीत हा मुद्दा चर्चेला घेण्यात आला होता. कॅबिनेटने एकमताने वाळू चक्क फुकटात उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला. यामुळे राज्य सरकारचे 200 कोटी रुपयांचे नुकसान होणार असले, तरीही जनतेसाठी हा निर्णय घेण्यात आला.
वाळू तस्करी आणि त्यावरून होणारे वाद-विवाद टाळण्यासाठी आंध्र सरकारने हा निर्णय घेतला. या निर्णयामुले अवैध मार्गाने वाळू व्यवसाय करणार्‍यांना चाप बसणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता ग्राहकाला केवळ वाहतुकीचा खर्च द्यावा लागेल. म्हणजे नदीतून वाळू फुकट मिळेल, ती घरापर्यंत किंवा बांधकामापर्यंत नेण्याचा वाहतुकीचा जो खर्च असेल, तेवढाच ग्राहकाला द्यावा लागेल. आंध्र सरकारने फुकटात वाळूबाबतचा निर्णय घेताना काही नियम व अटी घातल्या आहेत. यातील प्रमुख अटी म्हणजे वाळूचा अजिबात साठा करता येणार नाही. तसेच वाळूचा योग्य कारणासाठीच वापर करावा लागेल.